नाशिक : पुढारी वृत्तसेवा : लसीकरण कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना निर्बंध कायम आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या असल्या, तरी पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही नऊ लाख 90 हजार नागरिकांनी दुसर्या डोसकडे पाठ फिरविली आहे. आरोग्य विभागाने या नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले, तरी दुसर्या डोसचे प्रमाण सुमारे 17 टक्के वाढू शकते, असे बोलले जात आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार, पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 86 टक्के व दुसर्या डोसचे प्रमाण 63 टक्के आहे. राज्य सरकारने पहिला डोस 90 टक्के व दुसरा डोस 70 टक्के पूर्ण केलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हटविले आहेत. नाशिक जिल्ह्यातील प्रमाण कमी असल्यामुळे निर्बंध कायम असून, जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून लसीकरणाबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील 9 लाख 90 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसर्या डोसकडे पाठ फिरविली आहे. या नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.