चिपळुणातून तीन किलो सोन्यासह कारागिराचे अपहरण | पुढारी

चिपळुणातून तीन किलो सोन्यासह कारागिराचे अपहरण

चिपळूण पुढारी वृत्तसेवा: चिपळूण शहरातील ओतारी गल्ली येथे इन्कम टॅक्सची धाड टाकण्याचा बहाणा करून एका परप्रांतीय सोने कारागिराच्या दुकानावर छापा टाकला. तिघांनी त्यांच्याकडील रोख रकमेसह तीन किलो सोने व त्या व्यापार्‍याचे अपहरण केल्याची घटना चिपळुणात उघड झाली आहे.

मात्र, चिपळूण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तीन तोतया अधिकार्‍यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुद्देमालदेखील हस्तगत करण्यात आला आहे. आता या तीन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी चिपळूण पोलिसांचे पथक पुणे येथे रवाना झाले आहे.

ही घटना रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ओतारी गल्ली येथे घडली. येथील सोने कारागिर (मूळ रा. पश्चिम बंगाल) अशरफ शेख हे आपल्या दुकानात कारागिरांसह कार्यरत होते. गेली अनेक वर्षे ते सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करीत आहेत.

रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानात पोलिसी वेषात तिघेजण आले. आपल्याकडे भरपूर सोने व पैसा आहे. याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे ही धाड टाकण्यात येत आहे. आम्हाला तपासात सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी बनावट ओळखपत्रही दाखविले. त्यावर विश्वास ठेवून अशरफ शेख यांनी आपल्याकडील दागिने बाहेर काढले. काही दागिन्यांचे त्यांनी मोजमाप केले व दुकानातील दागिने ते तिघे बॅगेत भरू लागले. यावेळी अशरफ शेख यांनी, दागिन्यांची नोंद करा, सीसीटीव्ही सुरू आहे, असे सांगितले.

यानंतर त्यांनी तत्काळ सर्व दागिने बॅगेत भरले आणि सोने खरेदीसाठी ठेवलेले रोख 9 लाख रूपये देखील हस्तगत केले.
यानंतर शेख यांना बेड्या ठोकण्यात आल्या. तुम्हाला आमच्याबरोबर यावे लागेल, असे सांगून त्यांनी शेख यांना बाहेर काढले व शटर ओढून घेतले. त्यानंतर एका गाडीतून हे तिघे मुंबईच्या दिशेने शेख यांना घेऊन निघाले.

लवेलनजिक असलेल्या टोलनाक्याच्या अलिकडे त्यांची गाडी थांबली. त्या गाडीतून शेख यांना उतरवून दुसर्‍या गाडीमध्ये ठेवण्यात आले व त्यानंतर ते माणगावपर्यंत पोहोचले. यावेळी या तिघांनी माणगाव येथे नाष्टा केला.

यानंतर, आमचे पालघरमध्ये ऑफिस आहे. तुम्हाला तपासासाठी तिकडे यावे लागेल. ज्यावेळी अधिकारी बोलावतील त्यावेळी या असे सांगून त्या तिघांनी शेख यांना एका लक्झरीत बसविले व चिपळूणकडे पाठवून दिले.

याचवेळी चिपळूण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच नाकेबंदी केली. शेख यांच्याकडून गाड्यांचे नंबर, तीन व्यक्तींची ओळख आदी माहिती जाणून घेतली. यानंतर पुणे पोलिसांनी या माहितीवरून या तिघांना ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून तीन किलो सोने, नऊ लाखांची रक्कम असा ऐवज हस्तगत केला असून चिपळूण पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.

मात्र, या प्रकाराने चिपळुणातील सुवर्णकारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे करीत आहेत.

  • तीन किलो सोन्यासह नऊ लाख लांबवले
  • पुणे पोलिसांच्या ताब्यात संशयित

Back to top button