लंडन : आयफोन तयार करणारी दिग्गज कंपनी 'अॅपल'चा लोगो अर्थातच 'अॅपल'चा म्हणजेच सफरचंदाचा आहे. हे सफरचंद पूर्ण नसून ते थोडेसे चाखलेले, खाल्लेले आहे. हा लोगो का तयार करण्यात आला याची माहिती आहे का?
1976 मध्ये अॅपल कंपनीची स्थापना झाली त्यावेळी हा लोगो नव्हता. त्यावेळी कंपनीने शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांच्या आयुष्यातील त्या महत्त्वाच्या प्रसंगाला अनुसरून लोगो बनवला होता. झाडावरून पडणार्या सफरचंदाकडे पाहून न्यूटन यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीची जाणीव झाली होती. कंपनीने आपल्या लोगोमध्ये झाडाला लटकलेले सफरचंद आणि न्यूटन यांचे चित्र वापरले होते.
मात्र, 1977 मध्ये कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी नव्या लोगोचे डिझाईन करण्याची जबाबदारी रॉब जॅनॉफ या ग्राफिक डिझायनरवर सोपवली. रॉब यांनीच सध्याचा अर्धवट खाल्लेल्या सफरचंदाचा लोगो बनवला. हा लोग इंद्रधनुष्याच्या रंगाचा होता; पण हे रंग खर्या इंद्रधनुष्यातील रंगांच्या क्रमाने नव्हते. सफरचंदावर पान असल्याने वरील भागात हिरवा रंग वापरला होता.
रॉब यांनी एका मुलाखतीत सांगितले की लोगोमध्ये सफरचंद अर्धवट ठेवण्यामागील कारण हे होते की लोकांना हे सफरचंदच आहे, चेरी किंवा टोमॅटो नाही हे सहज समजावे! त्यांनी आणखी एक कारण दिले की लोकांनी या सफरचंदाची चव घेत असल्यासारखेही समजावे! या सफरचंदाचा रंग करडा, निळा असा बदलत आता काळा झालेला आहे!