

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-मुंबई महामार्गाची दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी केली.
गोंदेदुमाला येथे एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. सर्व सण साजरे होतील असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, गेली दोन वर्षे जगभरात कोरोनाचे सावट असल्याने कोणीही एकत्र येऊ शकत नव्हते. पंतप्रधानांनीही देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. सणवार साजरे करण्यासाठी खुद्द शासनाचीच नियमावली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांना कुठलाही अर्थ नाही. आता कोरोना आटोक्यात आल्याने सण-उत्सवाला गर्दी होणारच, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरखभाऊ बोडके, माजी जि. प. उपाध्यक्ष संपत सकाळे, हरीश चव्हाण, उमेश खातळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, राजाभाऊ नाठे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'शिवभोजन केंद्रचालकाचे अनुदान अदा करा'
महाविकास आघाडी सरकारने कष्टकरी, मजूर, गोरगरिबांच्या हितासाठी शिवभोजन ही अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली होती. शासनाने ही योजना सुरू ठेवावी तसेच शिवभोजन केंद्र चालवणार्या संस्थांचे थकलेले अनुदान तातडीने अदा करण्यात यावे, याबाबत आपण अधिवेशनात मागणी करू, असे भुजबळ यांनी सांगितले.