नाशिक : मर्‍हळ शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार | पुढारी

नाशिक : मर्‍हळ शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील मर्‍हळ शिवारात मंगळवारी (दि. 23) दुपारी 3 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करत शेळी ठार केली. गेल्या दोन महिन्यांपासून मर्‍हळ परिसरात बिबट्याच्या मादीसह दोन बछड्यांचा वावर वाढला आहे. मंगळवारी मादीने मच्छिंद्र गणपत कुटे यांच्या शेळीवर हल्ला चढवला, त्यामध्ये शेळी ठार झाली तर कुटे बालंबाल बचावले.

मर्‍हळ शिवारात वावी रस्त्याजवळ मच्छिंद्र गणपत कुटे यांची वस्ती आहे. मंगळवारी पुन्हा दुपारी तीनच्या दरम्यान शेळ्या चारत असताना बिबट्याने अचानक हल्ला चढवला. कुटे यांच्या हातातील शेळीच्या मानेला पकडत फस्त केली. काही करण्याच्या आत बिबट्याने हल्ला चढवल्याने कुटे यांनी आरडाओरडा केला. आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी काठ्या घेऊन धाव घेतल्याने बिबट्याने शेजारच्या उसात धूम ठोकली. दरम्यान, मर्‍हळ येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या वावर परिसरात वाढला आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला चढवत शेळी फस्त केली होती, वनविभागाला वारंवार कळवूनसुद्धा विभागाने साधा पंचनामा केला नव्हता. एरवी रात्री नजरेत येणार्‍या बिबट्याने दिवसा दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली आहे. वारंवार तक्रार करूनसुद्धा वनविभागाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. शेतकर्‍यांनी पंधरा दिवसांपूर्वी निर्‍हाळे परिसरात पिंजरा लावला असून, वनविभागाचे कोणीही तिकडे फिरकले नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

आमचे ऑडिट सुरू असून, मला पाहणी करणे शक्य नाही, परंतु पिंजर्‍यात कुत्र्याची पिल्ले ठेवली असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले आहे. बिबट्या भुकेने व्याकूळ झाल्यास पिल्ले खाण्यासाठी आल्यास बिबट्या पिंजर्‍यात अडकेल. – अनिल साळवे, वनक्षेत्रपाल.

हेही वाचा:

Back to top button