औरंगाबाद : पोलिसाला बेदम मारहाण; त्रिकूट गजाआड | पुढारी

औरंगाबाद : पोलिसाला बेदम मारहाण; त्रिकूट गजाआड

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : तरुणीच्या मदतीला गेलेल्या बिडकीन ठाण्यातील पोलिस अंमलदाराला मारहाण करणारे त्रिकूट बेगमपुरा पोलिसांनी गजाआड केले. यातील एका आरोपीविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. संदीप ज्योतीराम चव्हाण (वय 32), विकी नरसिंह रिडलॉन (वय 33, दोघे रा. गांधीनगर) आणि हरीश अशोक चौधरी (रा. बापूनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील विकी रिडलॉन हा रेकॉर्डवरील आरोपी आहे.

अधिक माहिती अशी की, बिडकीन ठाण्यातील पोलिस अंमलदार सचिन मधुकर म्हस्के (रा. पेठेनगर) हे 19 ऑगस्टला गोगाबाबा टेकडी परिसरातून घराकडे जात होते. तेव्हा एक टोळके तीन तरुणींची छेड काढत असल्याचे त्यांच्या नजरेत आले. म्हस्के यांनी तरुणींना मदत करण्यासाठी धाव घेतली. त्यांनी तरुणींना डायल112 वर कॉल करून मदत मागण्याचा सल्ला दिला. हा प्रकार टोळक्याच्या लक्षात आला. त्यांनी लगेचच म्हस्के यांना शिवीगाळ करून मारहाण केली. एकाने त्यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले होते. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विकी रिडलॉन कुख्यात

तिन्ही आरोपी हे गांधीनगर व बापूनगर भागातील रहिवासी आहेत. यातील विकी रिडलॉन हा कुख्यात आरोपी असून त्याच्याविरुद्ध
2011 ते 2018 या कालावधीत क्रांती चौक ठाण्यात लूटमार, विनयभंग, मारहाण, जिवघेणा हल्ला करणे आदी स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. तिन्ही आरोपींना पोलिसी खाक्या दाखविण्यात आला असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सीसीटीव्हीवरून सापडले

तिन्ही आरोपी पोलिस अंमलदार सचिन म्हस्के यांच्या ओळखीचे नव्हते. मात्र, बेगमपुरा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक मिळविला. त्याआधारे तिन्ही आरोपी निष्पन्न केले. पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस अंमलदार हैदर शेख, शिवाजी कचरे, सुदर्शन एखंडे, शरद नजन, विजय निकम आणि ज्ञानेश्वर ठाकूर यांनी आधी संदीप चव्हाण आणि विकी रिडलॉन यांना पकडले. त्यांना खाक्या दाखविल्यानंतर हरीश चौधरीचे नाव समोर आले.

 

Back to top button