नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डोंगरे वसतिगृह मैदानावर शनिवारी (दि. १५) 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होत असून, या ठिकाणी मंत्र्यांसह व्हीव्हीआयपींचा राबता राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 'मॅरेथॉन चाैक, चोपडा लॉन्स, कॅनडा कॉर्नर, पंडित कॉलनी' या ठिकाणी बॅरिकेडिंग असणार आहे. साध्या वेशातील पोलिसांची फौजदेखील कार्यक्रमस्थळासह शासकीय विश्रामगृह आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असेल.
'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमामुळे संभाव्य निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. मॅरेथॉन चौकाकडून पुढे, कॅनडा कॉर्नरकडून जुना गंगापूर नाका व पंडित कॉलनीकडे जाणाऱ्या वाहनांना सक्त मनाई असेल. त्यानुसार वाहतूक पोलिसांची पथकेही तैनात असतील.
कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ नागरिकांची तपासणी मेटल डिटेक्टरद्वारे करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमस्थळी नागरिकांना सॅक, पिशवी, जेवणाचे साहित्य, पाण्याची बाटली, प्लास्टिक-काचेच्या वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. आक्षेपार्ह व मनाई असलेले साहित्य बाळगल्यास प्रवेश नाकारण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
असा असणार फौजफाटा
उपआयुक्त (४), सहायक आयुक्त (७), पोलिस निरीक्षक (४०) तसेच ५०० पेक्षा जास्त पोलिस अंमलदारांना ड्युटी लावण्यात आली आहे. गुन्हे- १ व २ सह मध्यवर्ती गुन्हे पथक, दरोडाविरोधी, गुंडाविरोधी, खंडणीविरोधी व अमली पदार्थविरोधी पथके, बॉम्ब शोध व नाशक पथक, जलद प्रतिसाद पथक, विशेष शाखा, गोपनीय शाखेचे अंमलदार असा फौजफाटा कार्यक्रमस्थळासह शहरात बंदोबस्तासाठी असणार आहे.
हेही वाचा :