बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील अप्पर डेपो येथील चैत्रबन, राजीव गांधीनगर, सुपर आदी भागांत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
या भागात प्रशासनाचे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. दर गुरुवारी पाणीकपात करण्यात येत असल्याने नागरिकांना बुधवारी आणि शुक्रवारी पुरेसे पाणी मिळत नाही. विविध विकासकामांमुळे काही ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत, तर उंच भागातील रहिवाशांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक पाणीटंचाईमुळे हैराण झाले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या महिला, नागरिक व बहुजन वंचित विकास आघाडीचे पर्वती विधानसभा उपाध्यक्ष अॅड. रवींद्र गायकवाड यांनी पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. चैत्रबन येथे पाणी भरण्यासाठी परिसरातील महिलांची मोठी गर्दी झाली होती.
बिबवेवाडी परिसरात विविध विकासकामांसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे अप्पर डेपो येथील चैत्रबन झोपडपट्टीच्या भागातील काही जलवाहिन्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. यामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण होत आहे. तसेच वीजपुरवठाही खंडित होत आहे. याकडे महापालिका व महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गुरुवारच्या पाणीकपातीमुळे अप्पर डेपो परिसरात बुधवारी व शुक्रवारीदेखील पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. याबाबत महापालिका अधिकार्यांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने ऐन पावसाळ्यात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.
-उज्ज्वला गायकवाड, रहिवासी, अप्पर
गुरुवारी पाणीकपात असल्याने या भागात पाणीपुरवठा झाला नाही. त्यातच वडगाव पंपिंग स्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अप्पर डेपो भागात शुक्रवारी पुरेसा पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
– काशिनाथ गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
हेही वाचा :