Nashik : पीककर्ज वितरणात स्टेट बँक पिछाडीवर ; जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या ‘या’ सूचना

Nashik : पीककर्ज वितरणात स्टेट बँक पिछाडीवर ; जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या ‘या’ सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खरीप हंगामाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आजपर्यंत 1,140 कोटींचे पीककर्ज वितरीत केले असून हे प्रमाण 35.22 टक्के आहे. खासगी बँकांच्या तुलनेत स्टेट बँक कर्ज वितरणात पिछाडीवर असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या अधिकार्‍यांना गावोगावी मेळावे घेण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकर्‍यांना सहजतेने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व बँकांना केल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच खरीप पीककर्ज वाटप आढावा बैठक पार पडली. जिल्ह्याला यंदा पीककर्ज वितरणासाठी तीन हजार 239 कोटी रुपयांचे उद्दिष्ट सरकारने दिले आहे. एक लाख 84 हजार 956 शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करणे अपेक्षित आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बँकांनी आजपर्यंत एक हजार 140 कोटी रुपये शेतकर्‍यांना पीककर्ज म्हणून बँकांनी वितरीत केले आहे. तब्बल 64 हजार 636 शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यात केला असून त्याची टक्केवारी 34 इतकी आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीच्या धास्तीमुळे काही भागांमधील शेतकरी हे शेतीचे कामे लवकर हाती घेतात. पर्जन्याचे हे चक्र लक्षात घेत शेतकर्‍यांना पीककर्जाचा पुरवठा करावा, अशी सूचना कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी केली. जुलै, ऑगस्टमध्ये कर्जाची जादा मागणी विचारात घेत या दोन्ही महिन्यांत जास्तीत जास्त कर्ज वितरणाचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत दिले.

गेल्यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी संपूर्ण खरिपात 80 टक्के कर्जवाटप केले होते. यंदा 85 टक्क्यांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात आले आहे. ज्यांनी लवकर संपर्क साधला, अशा शेतकर्‍यांना कर्जाचे तातडीने वितरण करण्यात आले. इतरांनीही आवश्यक ती कार्यवाही करून पीककर्ज घ्यावे.
-गंगाथरन डी.,
जिल्हाधिकारी, नाशिक.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news