खते घालतानाची काळजी | पुढारी

खते घालतानाची काळजी

खतांच्या किमती दरवर्षी वाढतच आहेत. पैसे खर्च करायची तयारी असली तरी अनेक वेळा खतांची उपलब्धता बाजारात नसते. असेल तर कृत्रिम तुटवडा भासवून लिंकिंगने, जादा दराने घेण्यास भाग पाडले जाते. असे पैसे खर्च करून अनेक समस्यांचा सामना करून प्राप्‍त झालेले खत शेतीसाठी वापरताना शिफारशींचा विचार जरूर करायला हवा.

शेतात कोणते पीक आहे, त्यासाठी कृषी विद्यापीठाची काय शिफारशी कशा अमलात आणायच्या आदी बाबी विचारता घेऊन प्रत्यक्ष शेतात पिकांसाठी खतांचा वापर करताना खालीलप्रमाणे दक्षता घेणे गरजेचे ठरते. समतोल पीक पोषणासाठी नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्‍त खतांचा एकत्रित आणि शिफारशिप्रमाणे पुरेशा प्रमाणात वापर करावा. रासायनिक खतांबरोबच, सेंद्रिय आणि जीवाणू खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करावा. असा वापर शाश्‍वत शेतीसाठी फार आवश्यक आहे. खतांचा वापर योग्य वेळी तसेच योग्य पद्धतीने करावा. त्यामुळे अन्‍नद्रव्यांचा कायम अथवा तात्पुरत्या स्वरूपात होणारा र्‍हास टाळून खतांची उपयुक्‍तता वाढविता येते.

नत्रयुक्‍त खत पिकांना दोन ते तीन हप्त्यात विभागून द्यावे.

स्फुरद आणि पालाशयुक्‍त खते पेरणीच्या वेळी एकाच हप्त्यात द्यावीत.

खते पृष्ठभागावर फेकून न देता जमिनीत 10 ते 15 सें.मी. खोल पेरावीत.

सेेंद्रिय खते आणि पाण्यात न विरघळणारी खते मात्र पेरणीपूर्वी जमिनीवर पसरून मातीत मिसळावीत.

जमिनीतील ओलावा, पावसाची शक्यता आणि सिंचनाची सोय लक्षात घेऊन खत घालण्याच्या वेळेत थोडा फार फेरबदल करावा.

खत दिल्यानंतर पिकास हकले पाणी द्यावे.

खरीप हंगामापेक्षा रब्बी पिकांना स्फुरद खतांचा जास्त वापर करावा.

स्फुरदयुक्‍त खते (विद्राव्य) जमिनीवर

फेकू नयेत ती जमिनीत 10 ते 15 सें.मी. खोल घालावीत अथवा पट्टा पद्धतीने टाकावीत.

दाणेदार खते वापरावीत, स्फुरदयुक्‍त खते सेंद्रिय खतात मिसळून वापरावीत.

– अनिल विद्याधर

Back to top button