नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबड व सातपूर एमआयडीसीमध्ये जागाच शिल्लक नसल्याने नवे उद्योग नाशिककडे पाठ फिरवत आहेत. अशात पांझरपोळच्या जागेचा पर्याय उपलब्ध असून, ही जागा उद्योगांना मिळावी यासाठी पुन्हा एकदा लढा देण्याची उद्योजकांनी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत चर्चेच्या गुर्‍हाळात अडकलेल्या या जागेसाठी उद्योजकांकडून लवकरच मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे.

आमदार देवयानी फरांदे यांनी चुंचाळे येथील पांझरपोळ संस्थेची जागा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने संपादित करून ती उद्योगांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विधानसभेत केली होती. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या जागेप्रश्नी आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. ही जागा उद्योगांसाठी उपलब्ध करून द्यावी यासाठी औद्योगिक संघटनांनी आतापर्यंत उद्योगमंत्र्यांसह एमआयडीसी, उद्योग संचलनालय, विभागीय आयुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. याविषयी अनेक बैठकाही झाल्या आहेत. मात्र, जागेच्या मालकीच्या प्रश्नावरून हा तिढा अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे पांजरपोळ जागेसाठी 'एमआयडीसी'ने प्रस्ताव पाठवल्यास महसूल विभागाकडून जमीन संपादनाची प्रक्रिया पार पाडता येईल. याविषयी 2018 मध्ये विभागीय समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्याबाबतचे मुद्दे एमआयडीसीला पाठविले होते. याशिवाय तत्कालीन विभागीय आयुक्तांनी त्याबाबत सूचनाही केल्या होत्या. तरीही पांजरपोळच्या जागेचा तिढा कायम असल्याने, आता नव्याने लढा देण्याची तयारी उद्योजकांनी सुरू केली आहे. पांजरपोळची जागा एमआयडीसीला देण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा सर्वाधिक विरोध आहे. कारण एक हजार एकरांत सुमारे दोन लाखांहून अधिक वनसंपदा असून, नाशिककरांसाठी ही जागा 'ऑक्सिजन प्लांट' म्हणून ओळखली जाते. याशिवाय या जागेत दीड हजार गायींचे संगोपनही केले जाते. झाडे, वन्यप्राणी अशा जैवविविधतेने बहरलेल्या या परिसरावर कारखाने उभारल्यास पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे, त्यामुळे या जागेवर कारखाने उभारले जाऊ नये, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

ऑनलाइन पिटीशन मोहीम
पांजरपोळ जागेवरील बहरलेली जैवविविधता वाचविण्यासाठी वृक्षप्रेमींनी 'सेव्ह पांझरपोळ' अशी मोहीम यापूर्वी राबविली होती. यासाठी ऑनलाइन पिटीशन फाइल केली असता, त्यावर दोन हजार वृक्षप्रेमींनी स्वाक्षरी केली होती. सध्या पांझरपोळ जागा संपादनाचा मुद्दा समोर आल्याने, पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमींकडून पांझरपोळसाठी लढा दिला जाण्याची शक्यता आहे.

सॅमसोनाइटने दोन लाखांहून अधिक झाडे लावली, महिंद्राने हरियाली प्रोजेक्ट, टीडीकेचे वृक्षारोपण, देशातील पहिली ग्रीन बिल्डिंग एबीबीने उभी केली. त्यामुळे आम्ही पर्यावरणप्रेमी आहोतच. पांजरपोळ संस्था किंवा गोपालनाला आमचा अजिबातच विरोध नाही. मात्र, हे शहराबाहेर असावेत. पूर्वी पांझरपोळची जागा शहराबाहेर होती, म्हणून त्यांना दिली. आता त्यांना सुरगाणा, हरसूल येथे पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. त्यांना आम्ही मदत करू.– धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news