पुणे : रमजानमुळे कलिंगड, खरबूज, पपई खातेय भाव | पुढारी

पुणे : रमजानमुळे कलिंगड, खरबूज, पपई खातेय भाव

पुणे : मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना येत्या शुक्रवार (दि. 24) पासून सुरू होत असल्याने इफ्तारच्या अनुषंगाने बाजारात कलिंगड, खरबूज, पपईला मागणी वाढली आहे. बाजारात या फळांची आवकही वाढली आहे. मात्र, त्यातुलनेत मागणी अधिक असल्याने या फळांच्या भावात किलोमागे एक ते दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. पुरंदर परिसरात झालेल्या पावसाचा परिणाम अंजिराच्या उत्पादनावर झाला आहे. पावसामुळे अंजिर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

बाजारात जवळपास वीस ते पंचवीस टक्के अंजिराचा दर्जा घटल्याचे चित्र आहे. संत्र्याचा मृग बहार अंतिम टप्प्यात आला आहे. बाजारात संत्रीला चांगली मागणी असून त्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे तोड न झाल्याने बाजारात द्राक्षांची आवक घटली आहे. बाजारातील आवक-जावक कायम असल्याने त्यांचे दर टिकून आहेत. उर्वरित सर्व प्रकारच्या फळांची आवक-जावक कायम असून दर स्थिर आहेत.

रविवारी (दि. 19) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, संत्री 35 ते 40 टन, मोसंबी 30 ते 40 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार गोणी, पेरू 300 ते 400 क्रेटस, कलिंगड 30 ते 35 गाड्या, खरबूज 15 ते 20 गाड्या, अंजीर एक ते दीड टन तर द्राक्षांची 15 टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे – लिंबे (प्रतिगोणी) : 300-1500, अननस : 100-500, मोसंबी : (3 डझन) : 220-400, (4 डझन) : 100-200, संत्रा : (10 किलो) : 300-800, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-200, गणेश : 10-40, आरक्ता 20-70. कलिंगड : 5-13, खरबूज : 10-25, पपई : 5-20, पेरू (20 किलो) : 100-500, चिक्कू (10 किलो) : 200-500, अंजीर (10 किलो) 30-120. द्राक्षे (10 किलो) : सुपर सोनाका : 350-550, सोनाका : 300-450, जम्बो : 500-800, माणिकचमन (15 किलो) : 350-450, थॉमसन : 350-450.

 

Back to top button