

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत मुख्य रस्त्यांबरोबर प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येत आहेत. नगर शहरातील बहुतांश ड्रेनेज, पिण्याची पाईपलाईन, स्ट्रीट लाईट याबरोबरच रस्त्यांची कामे मार्गी लागत असल्याचे समाधान वाटते. हे रस्ते करताना काँक्रिटीकरणावर भर दिला जात आहे, जेणे करून हे रस्ते मजबूत व टिकावू होतील.
प्रभाग पंधरामधील नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे अनेक कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले. प्रभाग पंधरामध्ये नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नाने जंगमवस्ती येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन कामाला महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेविका सुवर्णा जाधव, विद्या खैरे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, दीपक खैरे, रवी जंगम, नारायण जंगम, बाबू जंगम, सागर जंगम, राजेश जंगम, नितीन जंगम, शंकर जंगम आदी उपस्थित होते. नगरसेवक प्रशांत गायकवाड म्हणाले, प्रभागातील नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्यांचे प्रश्न सुटावेत. त्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करीत असतो. नागरिकांच्या मागणीनुसार प्रत्येक भागातील विकास कामांना प्राधान्य दिल्याने अनेक भागातील प्रश्न सुटले आहेत.