नाशिक (येवला) ; पुढारी वृत्तसेवा : कोविडमुळे अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याने 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांवर अनाथ होण्याची वेळ आली आहे. पालक गेल्याने या अनाथ मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तथापि, अशा बालकांचे शिक्षणाच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाच्या अर्थसहाय्य योजनेचा प्रारंभ पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाला. येथील जयश्री गलांडे व वसंत गलांडे या मृत दाम्पत्याची दोन्ही अनाथ मुले प्रशांत (14) व अनिकेत गलांडे (12) यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत फिक्स डिपॉझिट म्हणून देण्यात आली.
यावेळी इतर नऊ महिलांना प्रत्येकी रुपये वीस हजारांचे चेक व सहा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रत्येकी 1100 रुपये प्रतिमहिना लाभ ना. भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, माजी जि. प. अध्यक्ष, अलकेश कासलीवाल, बाळासाहेब लोखंडे, स्वीय सहायक, वसंतराव पवार, अरुण शिरसाठ आदी उपस्थित होते.