Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी’ची पूजा, कधी?

Nashik Navratri : शिवरायांनीही केली होती इगतपुरीच्या घाटनदेवी’ची पूजा, कधी?
Published on
Updated on

 वाल्मीक गवांदे : नाशिक, इगतपुरी 

तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा कसारा घाट, धरण परिसर, डोळ्यात साठवता येणार नाही एवढी निसर्गराजाने भरभरून दिलेली वनराई… धुंद करणारा मंद मंद पाऊस… क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण… घनदाट वृक्षांची छाया… मुक्त हस्ते निर्माण झालेले घाटातले धबधबे… खोल खोल दर्‍या… हंबरत हंबरत मंजुळपणे चरणार्‍या गायी-गुरे… किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे… रानफुलांचा मंद मंद सुगंध… असे अनेकानेक अंगांनी नटून थटून शेकडो पर्यटकांचे स्वागत करणारा इगतपुरी तालुका हा विविध पंथी साधू- संतांच्या पदस्पर्शाने व ऐतिहासिक वास्तूने पावन झालेला आहे. प्रातःस्मरणीय घाटनदेवीच्या सान्निध्यामुळे तर त्या पावित्र्यात अधिकच भर पडली आहे. मुंबई- आग्रा महामार्गावर नाशिककडून मुंबईकडे जाताना नागमोडी वळणाचा कसारा घाट आहे. नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणार्‍या इगतपुरी परिसरात प्रवेश करतानाच थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासून प्राचीन असे घाटनदेवीचे मंदिर आहे. घाटात देवीचे स्थान असल्याने घाटनदेवी म्हणून ते प्रसिद्ध झाले आहे. घाटनदेवीचे रूप अत्यंत विराट असून, संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणून घाटनदेवीचा महिमा आहे.  (Nashik Navratri)

घाटनदेवीमातेचा श्रीदुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, बह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्णांडा, स्कंदमाता, कात्यायानी, कालरात्री, महागिरी, महासिद्धी, महागौरी व रिद्धी-सिद्धी अशी विविध रूपे आहेत. त्यातील पहिले रूप म्हणजे शैलपुत्री म्हणजेच घाटनदेवीमाता होय, प्राचीन माहितीनुसार, देवी वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली असता, रस्त्यात तिने या ठिकाणी विश्रांती घेतली व येथेच स्थिर झाली, तीच ही घाटनदेवीमाता होय. शैलाधिराज तनया म्हणूनही या देवीची मोठी ओळख आहे. वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे प्रयाण करीत असताना देवी येथे विश्रांतीसाठी थांबल्याची प्राचीन आख्यायिका असली, तरी ती खरी आहे, असे येथे आल्यावर वाटते. नैसर्गिक वातावरण आणि सुंदर परिसराने मोहित होऊन देवीने येथे मुक्काम केला, अशी पुरातन कथा आहे. या मंदिरासमोरच उंटदरी नावाचे सृष्टीसौंदर्याने नटलेले ऐतिहासिक स्थान असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना लुटून उंट याच दरीत लोटले होते. त्यामुळे या दरीला उंटदरी असे नाव पडले आहे. ( Navratri Nashik)

त्याचा अपभ्रंश उंटदरी असा झाल्याचे इतिहासात नमूद आहे. कोणताही सहृदयी माणूस या ठिकाणी आल्याबरोबर अगोदर सृष्टीसौंदर्याकडे लक्ष देतो. विशेषत: मुंबईकडे आणि नाशिककडे ये-जा करणार्‍या वाहनातील प्रवासी व भाविक इतके भारावतात की, त्यांना सौंदर्यक्षण टिपून घेण्याचा मोह आवरताच येत नाही. 1975 साली स्व. बि—जलाल किसनलाल रावत यांनी देवीच्या मूर्तीची स्थापना केली. तसेच माजी आमदार कै. विठ्ठलराव घारे, स्व. मुरलीधर चांदवडकर, रामचंद्र पारख, पन्नालाल टाटिया, रूपचंद साळी, श्रीकिसन लोया, मोहन छाजेड, भाई चव्हाण, चरणजितसिंग गर्चा, सुरेश मुन्शीलाल गुप्ता, सुरेश रावत, दौलत मालपाणी, प्रकाश पारख, मुकुंद चव्हाण, सुरेश शिंदे, मदनलाल लोया, माधव खंडेलवाल आदींनी नवरात्रोत्सव सुरू केला. भक्तांची नवसपूर्ती होऊ लागल्याने भाविकांची श्रद्धा वाढली आहे. अगोदरचे मंदिर जीर्ण झाल्याने सन 2019 मध्ये नवीन सुंदर सुबक मंदिर बांधून श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते जीर्णोद्धार सोहळा पार पडला.

शिवरायांनीही केली होती देवीची पूजा

जव्हारकडून पुण्याकडे मावळ प्रांतात जाणारा अतिदुर्गम रस्ता याच उंटदरीतून होता. तसेच भातसा नदीचा उगम याच उंटदरीतून झालेला आहे. उंटदरीच्या जवळच असणार्‍या घाटनदेवी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळ घाटात आले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळ्यांसह घाटनदेवीची यथासांग व शास्त्रोक्त पूजाअर्चा करून देवीचे दर्शन घेतले असल्याची नोंद इतिहासात नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराज कल्याण येथून सुरतवर स्वारी करण्यास जाताना श्री घाटनदेवी मंदिर येथे थांबले होते व देवीची यथासांग पूजा केली, असा ऐतिहासिक वारसा या मंदिरास लाभलेला असून, पूर्वी फक्त देवीचा तांदळा होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news