फडणवीसांकडे प्रशिक्षणासाठी जाणार: सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदप्रकरणी अजित पवार यांची टिप्पणी | पुढारी

फडणवीसांकडे प्रशिक्षणासाठी जाणार: सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदप्रकरणी अजित पवार यांची टिप्पणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदप्रकरणी एकावेळी अनेक जिल्ह्यांचा कारभार कसा पाहायचा, याचा गुरुमंत्र मी अजित पवार यांना देईन, अशी खोचक टिप्पणी फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या टिप्पणीवर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार असल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीस एकटे इतक्या जिल्ह्यांचा कारभार कसा पाहणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीसांनीही अजितदादांना तत्काळ प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विचारणार आहे की, मी तुमच्याकडे ट्रेनिंगला कधी येऊ, त्यासाठी किती फी लागेल? फडणवीस मला ही ट्रेनिंग मोफत देणार आहेत का, की फी घेणार, त्यांच्याकडे जाऊन मी माझ्या ज्ञानात भर घालतो, असे पवार म्हणाले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. ‘पीएफआय’वर बंदी आली असून, पुण्यात पीएफआयच्या कार्यकत्र्यांकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याबाबत पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘मी याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबत प्रत्येक जण आपापल्या परीने आपले मत व्यक्त करत आहे.

अशा देशद्रोही घटना करणार्‍यांवर कडक कारवाई व्हायला हवी. अशी घोषणाबाजी झाली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. पोलिसांनी तपास लवकरात लवकर करावा. तपासासाठी वेळ लावू नये,’ असेदेखील पवार यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, छगन भुजबळ यांचे ते व्यक्तिगत मत आहे, पक्षाचे मत नाही. प्रत्येकाला आपले व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे. पक्षाने त्याबाबत आपली भूमिका मांडली आहे, असे यावेळी पवार म्हणाले.

बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांना मारहाण केली आहे, यावर पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, अशा पद्धतीने मारहाण करणे अजिबात योग्य वाटत नाही. राज्यात पोलिस यंत्रणेवर ताण आला आहे, याबाबत पवार यांना विचारला असता, ते म्हणाले की, ज्या वेळेस मोठमोठे राजकीय मेळावे घडतात, त्यावेळेस अशा घटना घडतात. आता शिवसेना आणि शिंदे गटात ईर्षा निर्माण झाली आहे, कोणाचा दसरा मेळावा मोठा होतो. इतरांना त्रास न होता ते आपापल्या पद्धतीने मेळावा साजरा करतील, असेदेखील पवार यांनी स्पष्ट केले.

‘मला याबद्दल माहीत नाही’
अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘मला याबद्दल काहीही माहीत नाही. आमच्याकडे कोणीही आलेले नव्हते. काँग्रेसच्या लीडरने सांगितलेला तो विषय आहे. त्यामुळे तेच लोक जास्त अधिकारवाणीने बोलू शकतात. आत्ता आपण 2022 मध्ये आहोत आणि दोन ते तीन महिन्यांनी 2023 लागेल. कुठे आपण मागे 2014 मध्ये जात आहोत. उद्या काय करायचे ते ठरवले पाहिजे. सध्या महागाई आणि बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत,’ असे यावेळी पवार म्हणाले.

Back to top button