राहुरीत वृद्धासह तरुणाचा निर्घृण खून, 20 रूपयांसाठी वांबोरीत वृद्धाची हत्या | पुढारी

राहुरीत वृद्धासह तरुणाचा निर्घृण खून, 20 रूपयांसाठी वांबोरीत वृद्धाची हत्या

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील विलास नारायण कांबळे (वय 62) या वयोवृद्धास चप्पल दुरूस्तीचे 20 रूपये मागितल्याच्या कारणावरुन रागातून एकाने खिळे ठोकण्याचे हत्यार (हस्तीने) डोक्यासह डोळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, दुसर्‍या घटनेत म. फुले कृषी विद्यापीठातील कंत्राटी सुरक्षारक्षक सचिन इंद्रभान गावडे (वय 30) या तरूणाचा मृतदेह एका तळ्यात संशयास्पद आढळल्याने घातपाताची शंका व्यक्त होत आहे. वांबोरी बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला बसून चप्पल दुरूस्तीचा व्यवसाय करणारे नारायण कांबळे हे दैनंदिन प्रमाणे मंगळवार (दि. 20) रोजी दुपारी 4.30 वाजता बसले होते. यावेळी भाऊसाहेब वाघमारे (रा. मांजरसुंबा, ता. नगर) तेथे आला. त्याने कांबळेंकडून तुटलेली चप्पल दुरूस्त करून घेतली. कांबळे यांनी दुरुस्तीचे 20 रूपये मागितले. याचा राग आल्याने वाघमारे याने कांबळे यांच्याकडील हत्यारे घेत हल्ला केला.

खिळे ठोकण्याचे हत्यार कांबळे यांच्या डोळ्यात खुपसले. डोक्यास मारहाण केली. गंभीर जखमी झालेले कांबळे यांना तातडीने नगर येथे सिव्हील हॉस्पिटल व तेथून पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना प्राणज्योत 29 सप्टेंबर (गुरूवारी) रोजी रात्री 11 वा. मालवली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके, पो. नि. प्रताप दराडे यांनी पाहणी केली. याप्रकरणी मृत यांचा मुलगा गोरक्षनाथ विलास कांबळे यांनी तक्रार दिली. तपास पो.उ.नि. सज्जन नर्‍हेडा करीत आहे.

स्व. विलास कांबळे यांच्या पश्चात पत्नी, आई- वडिल, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, चर्मकार विकास संघ कार्यकर्त्या सुरेखाताई देवरे, बाळासाहेब गोळेकर, विठ्ठल देवरे, कैलास वाघमारे, गणेश कानडे, किरण घनहाट, भीमराज तेलोरे, रवींद्र आहेर, बाळकृष्ण वाघ, विशाल ठोकळ यांनी पोलिसांना निवेदन देत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. दुसर्‍या घटनेमध्ये म. फुले कृषी विद्यापीठामध्ये कंत्राटी सुरक्षारक्षक सचिन इंद्रभान गावडे (30 वर्षे) या तरूणाचा खून झाल्याची चर्चा आहे. त्यांचा मृतदेह तळ्यात आढळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

वांबोरीत शोककळा!
कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी रस्त्यावर बसून चप्पल दुरूस्तीचा व्यवसाय करणारे कांबळे यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर वांबोरी परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button