नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची 'ही' रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या... | पुढारी

नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची 'ही' रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या...

कळवण : (जि. नाशिक) बापू देवरे

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओमकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे 500 पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून, अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.

देवी भगवती हे महाराष्ट्रातील श्रद्धाळूंचे जागृत दैवत नाशिकपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. नांदुरी गाव सप्तश्रृंगगडाच्या पायथ्याशी आहे. वर जायला ११ किमीचा रस्ता घाटातून जातो. ज्या गडावर देवीचे देऊळ आहे. त्या गडाला सात शिखरे आहेत. सप्तश्रृंगगड निवासिनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो. देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर उभा आहे. सप्तशृंगगडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत. रामायणातील एका ऋचेनुसार हनुमानाने याच डोंगरावरून जखमी लक्ष्मणाच्या उपचारासाठी एक मुळी नेल्याच‌े सांगितले जाते. वणीच्या गडावर शिवालय तीर्थ, शीतला तीर्थ व कोटी तीर्थ अशी एकूण १०८ पवित्र कुंडे आहेत.

सप्तशृंगीगड

प्रचंड शीतकडा

तीर्थाच्या पुढे एक प्रचंड दरी शीतकडा म्हणून उभी आहे. ती सुमारे १५०० फूट खोल असावी. एका सवाष्णीने, ‘मला पुत्र होऊ दे भगवती, मी कडयावरून बैलगाडीत बसून उडी घेईन.’ असा नवस देवीला केला होता. देवीच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. त्या स्त्रीने आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून, शीतकड्यावरून खोल दरीत उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजूनही शीतकड्यावर पाहता येतात, अशी आख्यायिका आहे. हा प्रसिद्ध शीतकडा समुद्रसपाटीपासून ४,६३८ फूट उंच आहे. वणीच्या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७० पायऱ्या चढून जाव्या लागतात. इ.स. १७१० मध्ये या पायऱ्या उमाबाई दाभाडे यांनी बांधून घेतल्याची नोंद आहे.

देवीची मूर्ती

सप्तशृंगी देवी खानदेशी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. विशेषत: चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला १८ हात आहेत. ती पाषाण मूर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचित कललेली मान, 18 हातांत 18 विविध आयुधे असा देवीचा थाट आहे. ४७० पायऱ्या चढल्याचे देवीच्या प्रसन्न दर्शनाने सार्थक होते. दर पौर्णिमेला व नवरात्रात येथे येणाऱ्या भविकांनी गड गजबजून जातो. चैत्री पौर्णिमेला सुमारे एक लाखाहून अधिक भाविक गोळा होतात. मोठी यात्रा भरते. देवीचा गाभारा ओटीचे खण, नारळ व साड्यांनी भरून जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली होती. सिंहासनावर आरूढ झालेल्या देवीच्या 18 हातांत निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला ‘महिषासूरमर्दिनी’ असेही म्हणतात.

सप्तशृंगी गड,www.pudhari.news
सप्तशृंगीगड

ध्वज महात्म्य

चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता भगवतीच्या देवळावर ध्वज फडकला की, भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढ्या उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात, याचे त्यालाही आकलन होत नाही. सप्तशृंगीमातेचा ध्वज नेहमी उत्तरेकडे फडकत राहतो. स्वामी प्रकाशानंद सरस्वती यांनी धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदी यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ सुरू असतो. भगवती नवसाला पावते म्हणून येथे भक्तांचा सतत ओघ असतो. विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी स्त्रिया नवस करतात तसेच इतर पीडा टळावी म्हणूनही देवीला साकडे घालतात.

अनेक सुविधांमुळे कायापालट

गेल्या पाच वर्षांत सप्तशृंगगडाचा कायापालट करण्यात आला आहे. पायऱ्यांवर छप्पर आले आहे, तर आजूबाजूला कठडे बांधण्यात आले आहेत. वर जायचा व यायचा रस्ता वेगवेगळा आहे. वर चढताना विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आल्या आहेत. धर्मशाळेत उतरण्याची सुविधा आहे. नाममात्र किमतीत जेवण्याची सोय ट्रस्टने केली आहे. सप्तशृंगगडावर एक छोटे नगर वसले गेले आहे. पाण्याचा नवा जलकुंभ तयार करण्यात आला आहे, तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवासासाठी खास विश्रामगृहे बांधली आहेत. देवीचे फोटो, पुस्तके, प्रसाद तसेच पूजेचे साहित्य या सर्व गोष्टी मिळतात. पूजा सांगायला तसेच विविध विधी करायला पुरोहितवृंद हजर असतो. गुरुजींकडे घरगुती जेवणही मिळू शकते.

श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रह्मस्वरूपिणी धर्मपीठ, ओमकारस्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगीदेवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून महात्म्य सांगितले जाते. या स्थानाचा ‘नवनाथ कालावधी’ स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर आदी देवीभक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध असल्याचे सांगितले जाते. या पवित्र मंदिराच्या आजूबाजूस दाट जंगल आहे. सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगीदेवी भक्तांच्या हाकेला धावून जाणारी आहे. सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरे होत असतात.

देवाला प्रत्येक घरात जाता आले नाही म्हणून त्याने आईला पाठविले. त्यामुळे जन्मदात्या आईचे स्मरण करतानाच जगदंबेचे म्हणजेच सप्तशृंगीचे स्मरण केले जाते. सप्तशृंगीदेवीच्या भेटीला येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या तोंडी

‘सप्तशृंगी देवी माता, चरणी ठाव देई आता

सप्तशृंगी देवी माता, पायाशी जागा देई आता’

या ओळी असतात. जगात नारायणीचे अठराभुजा सप्तशृंगीदेवीचे भव्य रूप जर कुठे बघायला मिळते, ते सप्तशृंगगडावर, महाराष्ट्रातील आदिशक्ती देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान सप्तशृंगगड हे होय. ओमकारातील ‘म’कार पूर्ण रूप होऊन सप्तशृंगगडावर स्थिरावले म्हणून हेच मूळ रूप, पूर्ण रूप आणि हीच आदिमाया असे मानण्यात येते.

सप्तशृंगगडाबाबत महानुभावी लीळाचरित्रात उल्लेख आढळतो की, राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही शिलाखंड खाली पडला, तोच हा सप्तशृंगगड होय. उपासनेतून मनुष्याला शक्ती प्राप्त होते त्यामुळेच शक्ती म्हणजेच जगदंबेची उपासना केली जाते. जगदंबेची अनेक शक्तिपीठे भूतलावर आहेत. सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज हे आईच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये सापडतो. नवनाथ सांप्रदायातील नाथांपासूनच पीठाबद्दलचा कालावधी स्पष्ट सांगता येतो. शाबरी कवित्व अर्थात, मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली.

देवस्थानासंबंधीची आख्यायिका व प्राचीनत्व जाणून घेतल्यानंतर साहजिकच प्रश्‍न पडतो की, या मंदिराची स्थापना कशी झाली, याबद्दल. सप्तशृंगी ट्रस्टची स्थापना 22 सप्टेंबर 1975 रोजी झाली. त्याच वेळेस डोंगराच्या खोबणीत श्री भगवतीची मूर्ती समोरील बाजूस 20 x 20 चे पत्र्याचे शेड, अशी परिस्थिती होती. पण, विश्‍वस्त मंडळाने याबाबत दूरदृष्टीने विचार करून 6,000 चौरस फुटाच्या सभामंडपाचा आराखडा तयार केला. सन 1982 मध्ये कामाला सुरुवात झाली. गडावर आल्यावर उजवीकडे देवीच्या मंदिराकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. त्याला पहिली पायरी असे म्हणतात. तिथून सुमारे ४५० पायऱ्या चढून गेल्यानंतर गडाच्या कपारीत आपल्याला भगवतीचे दर्शन घडते. देवीला 11 वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात. डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ, गळ्यात मंगळसूत्र व पुतळ्यांचे गाठले, कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. पहाटे 5 वाजता सप्तशृंगीदेवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. त्यानंतर 8 वाजता आईच्या महापूजेला सुरुवात होते. त्यामध्ये आईच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते नवी पैठणी वा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. नवीन पानाचा विडा मुखी देऊन पेढा, वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7.30 वाजता आरती होते.

सप्तशृंगीदेवीबाबतची काही रहस्ये…

1.गडावर साग, काग, नाग दिसत नाही.

2. गडावर सप्तमातृका आहेत.

३. शिवा, चामुंडा, वाराही, वैष्णवी, इंद्राणी, कार्तिकेयी, नारसिंही या योगमाया गडाच्या सात शिखरांवर क्रमाने विराजमान आहेत.

4. गडावर मच्छिंद्रनाथांना देवीने शाबरी विद्येचे धडे दिले.

5.सप्तशृंगगड हा द्रोणागिरी पर्वताचाच एक भाग आहे

6. गडावर संजीवनी बुटी आहे. पण, कलियुगात देवीने ती गुप्त स्वरूपात ठेवली आहे.

7. देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे. तेथे दत्त दिगंबर भेटीसही येतात. त्या औदुंबराखाली शुभ्र नागराज असून त्याच्या मस्तकात शक्तिशाली हिरा आहे.

8. राम, सीता, लक्ष्मण वनवास काळी पंचवटीत आले, तेव्हा गडावर देवीच्या नित्य दर्शनास येत.

9. देवीच्या द्वारी कासव आहे. कासवीण जशी प्रेमळ नजरेने आपल्या पिलांचे पालन-पोषण करते, तसा आई भगवती आपल्या भक्तांचा सांभाळ करते आणि कासव गतीने दर्शनास यावे, असेही सांगते. घाई-गर्दी करू नये हाही त्यामागील उद्देश आहे.

१०. नाथ सांप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे.

११. गडावर तीर्थराज शिवालय आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून जे पाणी वाहिले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला, तीच गिरीजा (सध्याची गिरणा नदी) नदी आणि त्यापासून हे तीर्थ तयार झाले. यास गिरीजा तीर्थही म्हटले जाते. हे पापविनाशक तीर्थ आहे.

1२. कालिका तीर्थ हे कुंड कपारीत असून त्याचे पाणी थंड आहे.

1३. जेथे भगवतीने पानाचा विडा खाऊन थुंकला होता, चुळ भरली होती ते तीर्थ म्हणजे तांबुल तीर्थ. ते गडाच्या पश्चिमेला आहे. या कुंडाचे पाणीही तांबडे आहे.

१४. देवीच्या मुखातील विड्याला मोठा मान आहे. गडावर देवीला दैनंदिन विडा भरवला जातो आणि दुसर्‍या दिवशी तो विडा भक्तांना दिला जातो. भाग्यवान भक्ताला तो विडा मिळतो आणि तो विडा खाल्ला की, थुंकायचा नसतो.

15 सूर्यतीर्थ या कुंडाचे पाणी कायम उष्ण असते.

1६. सप्तशृंग पर्वताशेजारी नांदुरी गावानजीक एक पर्वत आहे त्यास खिंडार आहे. असे सांगतात की, देवी-दैत्य युद्धात देवीने त्रिशुलाने ते खिंडार पाडले आहे.

हेही वाचा :

Back to top button