नाशिक : आठवडाभरात नालेसफाईचा मनपाचा दावा

नाशिक : आठवडाभरात नालेसफाईचा मनपाचा दावा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून, कोणत्याही क्षणी मुंबई, नाशिकसह राज्यातील अन्य भागांत तो धडकण्याची शक्यता आहे. मात्र, अशातही महापालिकेच्या नालेसफाईची मोहीम सुरूच असून, आठवडाभरात शहरातील सर्व नालेसफाई केली जाणार असल्याचा दावा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आला. प्रत्यक्षात बहुतांश नैसर्गिक नाले, ड्रेनेज, पावसाळी गटारी कचऱ्याने तुडुंब असून, महापालिकेचा दावा यंदाही फोल ठरण्याची शक्यता आहे.

दरवर्षी महापालिका प्रशासनाकडून केवळ कागदावरच नालेसफाई दाखविली जात असल्याने नाशिकमधील बहुतांश भागांची 'तुंबापुरी' होत असते. विशेषत: दहिपूल परिसर, जुना फुलबाजार, नेहरू चौक, जुने नाशिक, सिव्हिल रुग्णालय व अन्य भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. ड्रेनजची साफसफाई केली जात नसल्याने, ढाप्यांमधून पाणी बाहेर पडून रस्त्यांवर तळे साचत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. काॅलेज रोड परिसरात दरवर्षी ड्रेनेज फुटून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे सातपूर, गंगापूरसह उपनगरांमधील नैसर्गिक नालेच गायब केल्याने, नाल्यातून प्रवाहित होणारे पाणी घरांमध्ये शिरत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर यंदा तरी नाशिककरांना दिलासा मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

दरम्यान, महापालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व नालेसफाईची मोहीम हाती घेतली असली तरी, अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने पावसाळ्याअगोदर काम पूर्ण होईल काय हा प्रश्न आहे. दरम्यान, बांधकाम विभागाने पुढील आठवडाभरात नालेसफाईचे काम मार्गी लागणार असल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात हे काम पूर्ण होण्याबाबत सांशकता आहे. कारण बहुतांश नाले कचऱ्याने तुडुंब भरले असून, आठवडाभरात त्याची सफाई होईल असे तूर्त तरी दिसून येत नाही.

पहिल्याच पावसात पोलखोल?

कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेकडून शहरातील नालेसफाई केली जाते. मात्र, पहिल्याच पावसात नालेसफाईचे पितळ उघडे पडत असते. यंदा ज्या गतीने नालेसफाईची कामे सुरू आहेत, त्यावरून पुढील काही दिवसांत ते पूर्ण होतील याबाबत साशंकता आहे. अशात पहिल्याच पावसात यंदाही महापालिकेच्या बांधकाम विभागाची नालेसफाई मोहीम कागदावरच असल्याची पोलखोल होण्याची शक्यता आहे.

नालेसफाईची कामे सुरू असून, पुढील आठवडाभरात ते पूर्ण होतील. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नाले, ड्रेनेजची साफसफाई केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे आव्हान असले तरी, आठवडाभरात ते पूर्ण होईल.

– शिवकुमार वंजारी, शहर अभियंता

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news