Nashik : विरोधी पक्ष सक्षम नाही ; भाजपचे कैलास विजयवर्गीय यांची टीका | पुढारी

Nashik : विरोधी पक्ष सक्षम नाही ; भाजपचे कैलास विजयवर्गीय यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नऊ वर्षांमध्ये देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. भाजपची बांधिलकी देशातील जनतेशी असताना देशातील विरोधी पक्ष सक्षम नसल्याची टीका पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केली. यावेळी वर्गीय यांनी भाजपची साथ सोडणाऱ्या पक्षांचा समाचार घेताना खुर्चीसाठी ते बाहेर पडल्याचा आरोप केला. तसेच भाजपसह कोणत्याही पक्षाच्या भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या विजयवर्गीय यांनी सोमवारी (दि. १२) पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार जयकुमार रावल, देवयानी फरांदे, सीमा हिरे व राहुल ढिकले, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते विजय साने, अमृता पवार आदी उपस्थित होते.

विजयवर्गीय पुढे म्हणाले, देशात गेली ७० वर्षे आणि पंतप्रधान माेदी यांच्या नेतृत्वातील ९ वर्षांच्या कार्यकाळाची तुलना केल्यास सर्वाधिक विकास गेल्या नऊ वर्षांत झाला. २०१४ पूर्वी यूपीएच्या काळात देशात निराशा होती. मात्र, मोदी यांच्या नेतृत्वात देशाने शेती, पायाभूत सुविधा, रोजगार, गरीब कल्याण, आरोग्य संरक्षण अशा सर्वच क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे. जीएसटी कर लावण्यासाठी यूपीए सरकार कचरत असताना पंतप्रधान मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गत आर्थिक वर्षात १ लाख ८६ हजार कोटींचा जीएसटी संकलन झाल्याचे विजयवर्गीय यांनी सांगितले.

यूपीएच्या काळात पंतप्रधान एक व निर्णय घेणारी व्यक्ती अशी अवस्था होती. पण पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षांत अनेक कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. देशाचा विकासदर ७.५ टक्के असून, २०२६ पर्यंत भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेईल, असा विश्वास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला. जगभरात मंदीचे भय असून, अमेरिकेलाही मंदीच्या चिंतेने ग्रासले आहे. भारतावर मंदीचा परिणाम कमी हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेसह अवघे जग भारताकडे बाजारपेठ म्हणून पाहते आहे. जगभरातील भारताचा हा डंका पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाल्याचे विजयवर्गीय म्हणाले. देशात महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार योग्य ती पावले उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गरीब, शेतकऱ्यांच्या पाठीशी

कळवणसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात यापूर्वी १०० खाटांचे रुग्णालय होते. तेथे अधिक २०० खाटांचे म्हणजे एकूण ३०० खाटांचे रुग्णालय उभे राहत आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदी केल्याने उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्याचे सांगत केंद्र व राज्य सरकार गरीब व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही विजयवर्गीय यांनी दिली.चार कोटी घरकुलांची उभारणी

काँग्रेस शासनाच्या ३० वर्षांच्या काळात देशात इंदिरा आवास योजनेतून २५ हजार घरकुले उभी राहिली नाही, असा आरोप कैलास विजयवर्गीय यांनी केला. तसेच मोदी शासनाच्या काळात पंतप्रधान घरकुल योजनेतून ४ कोटी गृहप्रकल्प उभे राहिले असून, ३ कोटी कुटुंबांनी गृहप्रवेश केला आहे. तर १ कोटी घरे निर्माणाधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

 

 

Back to top button