राज्याचे नेते थांबविले, हे तर किरकोळ..! खा. सुजय विखे यांची नाव न घेता नीलेश लंके यांच्यावर टीका | पुढारी

राज्याचे नेते थांबविले, हे तर किरकोळ..! खा. सुजय विखे यांची नाव न घेता नीलेश लंके यांच्यावर टीका

पारनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांना थांबविण्याचे काम आपण केले असून, पारनेरचा नेता तर आपल्यासाठी किरकोळ आहे. लोकांचे प्रश्न सोडवून आपण लोकसंग्रह जमा केला असून, हीच जनता योग्यवेळी आपली साथ करणार असल्याची ग्वाही देत खासदार डॉ. सुजय विखे यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना खासदार विखे म्हणाले, कोणतीही निवडणूक आली की पारनेर तालुक्यातील विरोधक फक्त विखे यांनाच टार्गेट करतात. एक आमदार दोन माजी आमदारांना घेऊन निवडणूक लढवितो.

ज्यांना यांनी माजी केले आहे, ते सुद्धा विद्यमान आमदारांच्या मांडीवर बसतात. तिसरे माजी आमदार यांच्याविषयी मी जास्त बोलणार नाही, कारण त्यांच्याविषयी माझ्या मनात आजही आदर आहे. मात्र, जनता हुशार आहे. जे मतदार बाजार समितीत होते, त्यांनीच खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधकांना भुईसपाट केले. या ठिकाणी आमरस, बिर्याणी आणि फेटे हे अमिष चालत नाही. तर जनतेला विकासकामांचा करिष्मा चालतो.

महसूल आपल्या दारी या कार्यक्रमात निघोज येथे तालुक्यातील साडेतीन हजार ज्येष्ठांना आरोग्य साहित्य देऊन भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी जनविकासाचे काम केले. हीच विकासाची जननी निरंतर सुरू ठेवण्यासाठी भाजपची नेतेमंडळी व कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी काम करीत असल्याची ग्वाही खासदार विखे यांनी दिली आहे.
यावेळी मंगलदास बांदल, सुजित झावरे, संदीप वराळ, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, सुप्याचे सरपंच दत्तात्रय पवार, गणेश शेळके, डॉ शिवाजीराव खिलारी, दिनेश बाबर, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले आदी उपस्थित होते.

तालुक्यात असुरक्षितेची भावना
तालुक्यातील जनतेत असुरक्षितेची भावना आहे. येथे अधिकारी येण्यास घाबरतात. पारनेरपेक्षा गडचिरोली बरी, असे म्हणतात. अधिकार्‍यांना येथे मारहाण होते. एवढा माज बरा नाही. आघाडी सरकारच्या काळात आमच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी करण्यात आल्याचे सांगत, तालुका सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची ग्वाही खासदार विखे यांनी दिली.

Back to top button