नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेत आता केवळ पुरुषच नव्हे, तर महिला वाहकही दिसून येणार असून, पहिल्या टप्प्यात 25 महिलांना प्रशिक्षण देऊन 1 एप्रिलपासून सेवेत आणले जाणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने एकूण 100 महिलांना वाहकपदी नेमणूक देण्यात येणार आहे.
महापालिकेची महत्त्वाकांक्षी असलेली सिटीलिंक शहर बससेवा गेल्या वर्षी 8 जुलैपासून नाशिककरांच्या सेवेत दाखल झाली आहे. गेली दीड वर्ष ही सेवा कोरोना महामारीच्या काळात अडकून पडली होती. त्यानंतर मात्र बससेवेने गती घेतली असून, नाशिक शहरच नव्हे, तर मनपा हद्दीबाहेर 20 किमी अंतरापर्यंत असलेले सिन्नर, पिंपळगाव, दिंडोरी, र्त्यंबक अशा ग्रामीण भागातही महापालिका बससेवा देत असल्याने प्रवाशी संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. सध्या मनपाच्या ताफ्यात 250 हून अधिक बसेस आहेत. तर त्यासाठी प्रत्येकी 500 वाहक आणि चालकांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्याबरोबरीने आता महिलांनाही वाहकपदी काम करण्याची संधी देण्याचा निर्णय नाशिक महानगर परिवहन महामंडळाने घेतला असून, त्या अनुषंगाने 100 महिला वाहक नेमण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 25 महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना 1 एप्रिलपासून ड्यूटी दिली जाणार आहे. महिला वाहकाबरोबरच नऊ महिला तिकीट चेकरही नेमण्यात येणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन बंड यांनी दिली.
28 चालक वाहकांवर कारवाई
नाशिककरांना योग्य व उत्तम शहर बससेवा मिळावी यादृष्टीने महामंडळाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. प्रवाशांशी उध्दटपणा व अरेरावी करणे, तिकीट न देणे, वेळ व नियमांचे पालन न करणे या प्रकरणी आतापर्यंत महानगर परिवहन महामंडळाने 28 वाहक व चालकांना कामावरून काढून टाकले आहे.