मांसाहारीपेक्षा शाकाहारी लोकांना कर्करोगाचा धोका १४ टक्क्यांनी कमी | पुढारी

मांसाहारीपेक्षा शाकाहारी लोकांना कर्करोगाचा धोका १४ टक्क्यांनी कमी

लंडन : सध्या जगभर शाकाहारी लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. काही लोक तर नुसतेच शाकाहारी नसून, ते ‘वेगन’ही आहेत. हे लोक मांसाबरोबरच अंडी, दूध असा कोणताही पशुजन्य आहार घेत नाहीत. सध्या शाकाहाराबाबत नवनवे संशोधनही होत आहे. आता इंग्लंडमधील एका नव्या संशोधनात आढळले आहे की, मांसाहारी लोकांच्या तुलनेत शाकाहारी लोकांना कर्करोगाचा धोका 14 टक्क्यांनी कमी असतो.

जगभरातील अनेक डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ शाकाहाराचे समर्थन करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे शरीरात रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल यांचा स्तरही सामान्य राहतो. शाकाहारामुळे हायपरटेन्शन, लठ्ठपणा आणि टाईप-2 मधुमेहासारख्या गंभीर समस्यांचा धोका कमी होतो. अलीकडेच वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च यूके आणि ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थने याबाबतचे एक संशोधन केले. त्यामधून असे दिसून आले की, शाकाहारी लोकांना मांसाहारींच्या तुलनेत कर्करोगाचाही धोका कमी असतो. ‘बीएमसी मेडिसीन’ जर्नलमध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. या संशोधनासाठी 4 लाख 72 हजार लोकांची पाहणी करण्यात आली.

त्यांचा ‘डाएट डेटा’ यूके बायोबँकेतून घेण्यात आला. मांसाहार करणार्‍या लोकांना वेगवेगळ्या गटात वर्गीकृत करण्यात आले. या लोकांच्या 11.4 वर्षांच्या डाएट पॅटर्नचा अभ्यास करण्यात आला. पहिल्या गटात असे लोक होते जे आठवड्यातून पाचपेक्षा अधिकवेळा मांसाहार करीत. हे लोक रेड मीटपासून चिकनपर्यंत सर्वप्रकारचा मांसाहार करीत. दुसर्‍या गटात असे लोक होते जे आठवड्यातून पाच किंवा त्यापेक्षा कमी वेळा मांसाहार करीत. तिसर्‍या गटात केवळ मासे खाणारे लोक होते. चौथ्या गटात शाकाहारी लोक होते ज्यांनी मांस किंवा मासे खाल्ले नाहीत. वैज्ञानिकांना आढळले की, नियमितपणे मांसाहार करणार्‍या लोकांच्या तुलनेत कमी मांसाहार करणार्‍या लोकांना कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा धोका 2 टक्के कमी असतो. केवळ मासे खाणार्‍यांना हा धोका 10 टक्के आणि शाकाहारी असणार्‍यांना चौदा टक्के कमी असतो.

Back to top button