नाशिक : एचएएलचे मरिमाता गेट अखेर वाहतुकीसाठी खुले

ओझर : रखडलेला रस्ता अखेर खुला झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांकडून रस्त्याचा वापर सुरु झाला आहे. ( छाया: मनोज कावळे)
ओझर : रखडलेला रस्ता अखेर खुला झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांकडून रस्त्याचा वापर सुरु झाला आहे. ( छाया: मनोज कावळे)
Published on
Updated on

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा

मरिमाता गेट व नॅशनल हायवे गेट नं. १ दरम्यानचा वहिवाट रस्ता एचएएल प्रशासनाने कोरोना काळात बंद केल्यानंतर कायमचा बंद ठेवण्यात आला होता. याबाबत बाणगंगा पंचक्रोशीतील शेतकरी व आमदार बनकर यांच्या प्रयत्नांनी न्यायालयीन निर्णय होऊन रखडलेला रस्ता अ‌खेर खुला करण्यात आला. त्यामुळे शेतकरी, नागरिकांची मोठी गैरसोय टळणार आहे.

परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा असलेला मरिमाता गेट रस्ता कोरोना काळात एचएएल प्रशासनाकडून बंद करण्यात आला होता. त्यानंतरही तो खुला केला जात नसल्याने परिसरातील दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, कसबे व मौजे सुकेणे गावच्या शेतकऱ्यांनी दावा दाखल केला होता. त्यात निफाडचे प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता. त्याविरोधात एचएएल प्रशासनाने अपर जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यात शेतकऱ्यांच्या बाजूने संदीप पवार व उत्तम कदम यांनी युक्तिवाद करीत 100 वर्षांहून अधिक काळापासून शेतीमालासाठी याच मार्गाने वहिवाट असल्याने मरिमाता गेट रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी केली होती. हा दावा न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी मान्य करीत प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांचा आदेश कायम ठेवला होता. तसेच गेट रस्ता खुला करण्याबाबत गत महिन्यातच आदेशित केले होते. परंतु, एचएएलकडून रस्ता खुला करण्याची कारवाई होत नसल्याने आमदार दिलीप बनकर यांनी याबाबत जिल्हा नियोजन बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत प्रशासनाला रस्ता खुला करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्याने शुक्रवारी (दि. 14) निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या आदेशानुसार, ओझरचे मंडळ अधिकारी गिरीश कुलकर्णी व कामगार, तलाठी यांनी एचएएल प्रसाशन व पोलिस अधिकाऱ्यांना सोबत घेत मरिमाता गेट रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, कसबे व मौजे सुकेणे येथील शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे. दिक्षी सुकेणा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने प्रतिभा धनवटे, भूषण धनवटे, रवींद्र माळोदे, संदीप जायभावे, अशोक कदम, रामभाऊ चौधरी, देवीदास चौधरी, आनंद गाडे, किशोर पागेरे, दत्तू बोराडे, रमेशचंद्र घुगे, संदीप कातकाडे आदींनी दावा दाखल केला होता, तर ॲड. संदीप पवार व ॲड. उत्तम कदम यांनी जुने पुरावे व वहिवाटीबाबतची बाजू मांडली होती. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून 17 ऑक्टोबर ही तारीख देण्यात आलेली असल्याने सर्वपक्षीय, सर्व गावांच्या सरपंचांनी एकत्रित बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवावी, अशी भावना ओझरचे माजी सरपंच हेमंत विजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.

दोन वर्षांपासून ओझर-सुकेणा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी शासन दरबारी अनेकदा पत्रव्यवहार केला होता. जिल्हाधिकारी, एचएएल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती, तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही मुद्दा मांडला होता. त्यात पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मरिमाता गेट खुले करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. – आमदार दिलीप बनकर.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news