पुणे, पुढारी वृत्तसेवा: बहुप्रतिक्षित पुणे-सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला अखेर हिरवा कंदिल मिळाला असून, 2 डिसेंबर 2022 पासून ही सेवा सुरू होणार आहे. आठवड्यातून 4 दिवस ही सेवा असणार आहे. यामुळे पुणेकरांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे. मागील महिन्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुण्यात आल्यावर पुणेकरांच्या मागणीनुसार 6 ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता पुणे- सिंगापूर ही आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होत आहे.
येत्या काळात आणखी 5 ठिकाणी पुण्यातून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होणार आहे. यापुर्वी पुण्यातून फक्त दुबई, शारजाह येथेच फक्त आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होती. आता सिंगापूर सेवेमुळे आंतरराष्ट्रीय सेवेत वाढ झाली आहे. पुण्यातून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू व्हाव्यात, यासाठी दै.पुढारी'मध्ये अनेकदा वृत्त प्रसिध्द करण्यात येत होती. अखेर ही सेवा सुरू झाली.
पुण्यातून सिंगापूरला सुरू होणारी ही आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवड्यातून 4 दिवस असणार आहे. म्हणजेच आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच या सेवेचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे.
पुण्यातून सिंगापूरला ही सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासातच प्रवाशांना आपला प्रवास संपवता देखील येणार आहे. पुण्याहून सिंगापूरला पोहचण्यासाठी विमानाला 8 तास तर सिंगापूरहून पुण्यात पोहचण्यासाठी विमानाला 4 तास लागणार आहे.
तिकीट दर
– 17 हजार 799 रूपये (इकॉनॉमी)
– 32 हजार 459 रूपये (प्रिमियम इकॉनॉमी)
– 82 हजार 999 रूपये (बिझनेस क्लास)
दिवसभरात 2 फेर्या – वेळ (किती ते किती)
1) पुणे-सिंगापूर – दु.2 वाजून 10 मिनिटे – रात्री 10 वाजून 30 मिनिटे
2) सिंगापूर ते पुणे – स.11 वाजून 50 मिनिटे – दु.3 वाजून 15 मिनिटे