नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात?

नाशिक : नुकसानीचे अनुदान मार्चनंतर तरी बँकखात्यात?
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अधिवेशनादरम्यान अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अनुदान वितरित करण्याची अटकळ बांधली जात होती. पण, मार्चअखेर व बाधित शेतकर्‍यांच्या याद्या अद्ययावतीकरणामुळे हे अनुदान मिळण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्याचे सुमारे 225 कोटी रुपयांचे मदतीचे अनुदान रखडले आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील अंदाजे सव्वादोन लाख हेक्टरवरील पिके पावसाने बाधित झाले. काही तालुक्यांमध्ये कमी कालावधीत झालेल्या मुसळधार पावसाने अवघी शेतीच वाहून गेली. तर अनेक ठिकाणी जमीन खरवडल्याने पुढील काही महिने पिकेच येणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे निकष बाजूला सारत अनुदानाची घोषणा केली. मात्र, पावसाळा संपुष्टात येऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही शेतकर्‍यांच्या बँकखात्यावर अनुदान जमा झालेले नाही. शासनाकडून अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात अनुदान वितरित केले जाईल, अशी चर्चा होती. परंतु, मार्चअखेर तसेच शेतकर्‍यांच्या याद्या अद्ययावत करण्याचे काम शासन पातळीवर सुरू आहे. परिणामी मार्चअखेरनंतरच शेतकर्‍यांच्या बँकखात्यात अनुदानाची रक्कम जमा होईल, असे समजते आहे. तोपर्यंत बाधित शेतकर्‍यांच्या नशिबी केवळ प्रतीक्षाच उरली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनांकडून बाधितांच्या याद्या मागविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news