

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर पोलीसांनी बावडा गावात बेकायदेशीर चालणाऱ्या हातभट्टी दारू धंद्यावर छापा टाकत कारवाई केली आहे. यात २ लाख ४९ हजार रुपयांचा माल जप्त केला असून भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ४ जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील बावडा येथे बुधवारी (दि. १ मार्च) पहाटे ५ वाजण्याच्या सुमरास ही कारवाई करण्यात आली. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
या पथकाने बावडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ४ जणावर छापा घातला. यात मानवी शरीरास अपायकारक अशा रसायनाने भरलेले ३०० लिटरचे बॅरल ३ नग, २०० लिटरचे १२ नग, १०० लिटरचा १ नग व इतर साहित्य असा एकूण २ लाख ४९ हजार रुपयाचा माल जप्त केला आहे. भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ४ जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र येथे सुरू आहे.
आगामी होळी, ग्रामदैवत यात्रा, जयंती उत्सव व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस यांच्याकडून अवैध धंद्यावर धाड टाकून धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहायक फौजदार के. बी. शिंदे, महिला पोलीस हवालदार माधुरी खंडागळे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, लखन साळवी, पोलीस शिपाई विकास राखुंडे, विनोद काळे, समाधान केसकर यांनी केली.