नगर : व्यापार्‍यास लुटणार्‍या आरोपींकडून जाणून घेतला घटनाक्रम | पुढारी

नगर : व्यापार्‍यास लुटणार्‍या आरोपींकडून जाणून घेतला घटनाक्रम

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील सराफ व्यावसायिक बंडू उर्फ राजेंद्र चिंतामणी यांच्यावर हल्ला करून लुटणार्‍या तिघा आरोपींना पाथर्डी शहरातील नवीपेठ व शेवगाव रस्त्यावरील आनंदनगर येथे घटनास्थळी आणून पोलिसांनी तपास कामी गुन्ह्याच्या घटनाक्रमाची महिती जाणून घेतली. चिंतामणी यांच्यावरील हल्ल्यानंतर पाथर्डीत तीव्र पडसाद उमटले होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते व पाथर्डीकरांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध मूकमोर्चा काढून निषेध नोंदविला होता. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबर या घटनेतील आरोपींचा शोध लावण्याची मागणी मोर्चात करण्यात आली होती.

पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून मोर्चानंतर चोवीस तासांच्या आत या घटनेतील संशयित आरोपी विशाल शिवाजी एडके (रा.पाथर्डी), दीपक दत्तात्रय राख (रा. अहमदनगर) व दीपक तोताराम सोमनकर (रा. रघुहिवरे) या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन अटक केली. अटकेनंतर या आरोपींनी हा गुन्हा कशा पद्धतीने केला, याची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना शहारातील नवीपेठ येथील चिंतामणी यांच्या सोन्याच्या दुकानजवळ आणले. तेथून पुढे त्यांचा पाठलाग करून चिंतामणी यांच्यावर घरानाजिकच हल्ला केल्याचे आरोपींनी सांगितले.

पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, तपासी अधिकारी सचिन लिमकर हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांना पोलिसांचे अस्तित्व प्रदर्शनाने जाणवले.

Back to top button