नाशिक : वाहतूक व्यवस्थेसाठी मानवी साखळी

मालेगाव : मानवी साखळीद्वारे वाहतूक आदी समस्यांकडे लक्ष वेधताना आम्ही मालेगावकर विधायक समितीसह विविध संघटनांचे पदाधिकारी.
मालेगाव : मानवी साखळीद्वारे वाहतूक आदी समस्यांकडे लक्ष वेधताना आम्ही मालेगावकर विधायक समितीसह विविध संघटनांचे पदाधिकारी.

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वाहतूक समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि त्यातून निर्माण परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी मालेगाव विधायक संघर्ष समितीने शनिवारी (दि. 4) मानवी साखळी केली. मोसम पुलजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. मालेगाव महानगरपालिका, पोलिस, सार्वजनिक बांधकाम व परिवहन विभागांच्या विरोधात जनभावना व्यक्त करण्यात आल्या.

अपघाताने शहरात मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. अनेक समस्या भेडसावत असून, या मुर्दाड व्यवस्थेला जागे करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आजचे आंदोलन सौम्य असून, यापेक्षा मोठे आंदोलन येणार्‍या काळात केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत, असा इशारा विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी यावेळी दिला. सामाजिक कार्यकर्ते विवेक वारुळे यांनी शहरात चोरीच्या घटना वाढत असताना पोलिस प्रशासन मनुष्यबळ कमी असल्याचे सांगून वेळ मारण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांचा वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण नसल्याने कंटेनर थेट नागरी वस्तीत शिरतात, याकडे जगदीश गोर्‍हे यांनी लक्ष वेधले. वाहतूक समस्या निवारण्यासाठी वाहतूक व रस्ते सुरक्षा समितीची बैठक घेतली जात नसल्याने समस्या बिकट होत चालल्याची खंत सतीश कलंत्री यांनी व्यक्त केली. रस्ते, रिप्लेक्टर व दुभाजक यांचे महत्त्व पुरुषोत्तम काबरा यांनी विशद केले. शहरातील वाढत्या अपघातामुळे युवक पेटून उठला असून, प्रशासनाने आता अंत बघू नये, असे मत अ‍ॅड. परीक्षित पवार यांनी मांडले. 'जनतेचे प्राण झाले स्वस्त, प्रशासन आपले धुंदीत मस्त', 'वाहतूक, रस्ते, स्वच्छता सर्वांचे वाजले तीन तेरा', 'पोलिस यंत्रणा नाही पुरेशी, जनता जाते जिवाशी', 'वाहतूक शाखेचा राहिला नाही धाक, जनतेच्या जीवाला कसला हा ताप', असे फलक आणि घोषणा देण्यात आल्या.
यावेळी रामदास बोरसे, निखिल पवार, देवा पाटील, प्रा. अनिल निकम, जितेंद्र देसले, नरेंद्र सोनवणे, कलीम अब्दुल्ला, अ‍ॅड. अतुल महाजन, दीपक पाटील, बंडू माहेश्वरी, दीपक बच्छाव, कपिल डांगचे, कैलाश शर्मा, श्याम गांगुर्डे, राकेश डिडवानिया, करण भोसले, अतुल लोढा, निसार शेख, डॉ. अरुण पठाडे, गणेश जंगम, अनिल पाटील, नेविलकुमार तिवारी, रमेश उचित आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तर जुलैत चक्का जाम
शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, वाहतूक पोलिस शाखेला वाढीव मनुष्यबल द्यावे. सर्व प्रमुख रस्त्यांवर दुभाजक विकसित करावे, रिफ्लेक्टर, रबरी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे, उच्च प्रकाश क्षमतेचे पथदीप लावावेत, पार्किंग झोन, रिक्षाथांबे, बसथांबा व हॉकर्स झोनची निर्मिती करावी, ट्रक टर्मिनल विकसित करावे, शहरात दिवसा अवजड वाहतुकीला बंदी घालावी, अतिक्रमण निर्मूलन पथक व बेशिस्त पार्किंग नियंत्रणासाठी टोइंग व्हेईकल यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित करावी, वाहतूक व रस्ते सुरक्षा समितीची नियमित बैठक घेण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावर पंधरवड्यात समाधानकारक कार्यवाही न झाल्यास स्वाक्षरी मोहीम राबवून मनपा, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर कार्यवाहीची मागणी राज्यपालांकडे करण्यात येईल. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना सोबत घेऊन चक्काजाम आंदोलन केले जाईल, अशी घोषणा देवा पाटील यांनी केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news