नगर : ग्रामीण भागात शेती मशागतीसाठी बळीराजाची लगबग | पुढारी

नगर : ग्रामीण भागात शेती मशागतीसाठी बळीराजाची लगबग

जेऊर : शशी पवार

नगर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. यंदाच्या खरिपात शेतशिवारं पेरणीसाठी सज्ज करून ठेवण्यात आले असून, आता वरुणराजाची प्रतीक्षा केली जात आहे. चालू वर्षी 8 जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात होते. पाऊस झाला, तर मृग नक्षत्रानंतर लगेच मूग व कडवळ पेरणी करण्यात शेतकरी व्यस्त होतो. परंतु पावसाने या नक्षत्रात हुलकावणी दिल्यास मुगाच्या पेरणीची वेळ निघून जाते. 22 जून रोजी आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होत आहे.

नाशिकच्या बजरंगवाडी परिसरात 70 वर्षीय वृद्धाची आत्महत्या

या नक्षत्रानंतर बाजरी, सोयाबीनची पेरणी करण्यात येत असते. परंतु सर्व पेरण्या या पावसावरच अवलंबून असल्याने शेतकरी डोळ्यात आस लावून पावसाची वाट पाहत असतो. पुनर्वसू नक्षत्राला 6 जुलै रोजी सुरुवात होणार असून या नक्षत्रापासून लाल कांद्याचे रोपं टाकण्याची लगबग शेतकरी करत असतात.

11 ऑगस्ट नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या दिवसांपासून लाल कांद्याच्या लागवडीस सुरुवात करण्यात येते. लाल कांद्याची लागवड महिना ते दीड महिना सुरू असते. 26 ऑगस्ट रोजी बैलपोळा सण असून शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. पोळ्यानंतर ज्वारीची पेरणी, तसेच लाल कांद्याची लागवड जोर धरत असते.

‘प्रदूषण नियंत्रण’ची महापालिकेला नोटीस; 70 नाल्यांच्या पाण्यावर काय प्रक्रिया केली ते सांगा

दीपावलीनंतर स्वाती नक्षत्रात थंडीचे वातावरण पाहून शेतकरी गव्हाच्या पेरणीला सुरुवात करतात. तसेच गावरान कांद्याचे रोपं याच कालावधीत टाकण्यात येतात, तर गावरान कांद्याची लागवड नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. शेतीचे हे गणित गृहीत धरून शेतकरी कामाचे नियोजन करत असतो. परंतु पावसाने निराशा केली, तर शेतकरी हवालदिल होऊन जातो.

नगर तालुक्याला काही वर्षांपूर्वी ज्वारीचे पठार म्हणून ओळखले जायचे. परंतु सद्यस्थितीत शेतकर्‍यांनी अनेक जिरायत क्षेत्र सिंचनाखाली आणून कांदा लागवडीवर जोर दिला आहे. त्यामुळे आता नगर तालुका कांदा उत्पादनासाठी अग्रेसर म्हणून ओळखला जातो.

उत्तराखंडमधील बस अपघातातील मृतांचा आकडा २६ वर

त्यातील जेऊर पट्ट्यातील ससेवाडी, इमामपूर, बहिरवाडी या गावात डोंगरउताराची जमीन असल्याने लाल कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिसरात परराज्यातील कांदा व्यापारी स्थायिक होेऊन आपला व्यापार जेऊर गावामधून करत आहेत.
येथील कांदा कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, कोलकाता, छत्तीसगड या राज्यांनी मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.

पहिल्या पावसात पेरणी टाळावी. पुरेशी ओल पाहूनच पेरणी करावी. बी-बियाणे खरेदी करताना बिल व लॉट नंबर दुकानदाराकडून घेणे गरजेचे. बोगस बियाणांपासून सावध रहावे. चांगल्या कंपनीच्या बियाणांची खरेदी करा.
-संदीप काळे शेतीतज्ज्ञ.

Back to top button