नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त

पीक विमा
पीक विमा

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा
नामपूरसह मोसम खोर्‍यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत.

मोसम खोर्‍यात मका, बाजरी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. महागडी बियाणे, खते, औषधे वापरून शेतकरी बांधवांनी शेतीत भांडवल टाकले. मात्र, अतिपावसाने पिके उद्ध्वस्त झाली. गत आठवड्यात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दौरा करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. आमदार दिलीप बोरसे यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन सादर करीत वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले. शेतकरी संघटनांनीदेखील पीकविमा व नुकसानभरपाईसाठी आवाज उठविला. सत्ताधारी व विरोधकांकडून राजकीय पातळीवर एक सूर आळवला जात असला सरकारी यंत्रणा स्वस्त असल्याचे दिसून आले आहे. तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांचा संयुक्त पंचनामा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर होईल, तेव्हा कुठे नुकसानीबाबत शासनस्तरावरून हालचाली होतील. आजघडीला शासकीय यंत्रणा खो वर खो देत असून, तलाठ्याकडे गेल्यास ते कृषी सहायकाकडे पाठवतात, कृषी सहायक ग्रामसेवकांकडे पाठवतात, याकडे मात्र कोणताच राजकीय पक्ष लक्ष देत नसल्याने त्यांचा प्रपंच निरर्थक असल्याचा सूर उमटत आहे. राजकीय नेत्यांनी नौटंकी बंद करून शासकीय यंत्रणेला रुळावर आणावे अन्यथा शेतकरी संघटना लोकप्रतिनिधींना गावात घुसू देणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी शशिकांत भदाणे, किरण पाटील, बाळासाहेब चौधरी, शैलेंद्र कापडणीस, नयन सोनवणे, बिपिन सावंत, प्रवीण सावंत, जितू सूर्यवंशी, माणिक निकम, शेखर पवार यांनी नोंदविली आहे.

बागलाणची शासकीय यंत्रणा निद्रिस्त असून, तुमच्या गावात 65 मिलिमीटर पाऊस पडला नाही, अशी चुकीची माहिती देऊन मुद्दाम पंचनामे टाळले जात आहेत. विमा कंपनीचा टोल फ्री नंबर कधीच लागत नाही. गावागावातील शेतकर्‍यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना जाब विचारला पाहिले. – शैलेंद्र कापडणीस, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news