‘उलटा चोर...’ पोलिसानेच आधी मारले! लोहगाव पेट्रोल पंपावरील संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद | पुढारी

‘उलटा चोर...’ पोलिसानेच आधी मारले! लोहगाव पेट्रोल पंपावरील संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पेट्रोल पंपासमोर लावलेली कार बाजूला घेण्याचे सांगितल्याने झालेल्या वादावादीतून पाच जणांनी मिळून पोलिस कर्मचार्‍याला मारहाण केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी लोहगाव भागात घडली होती. मात्र आता या मारहाणीचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये संबंधित पोलिस कर्मचारीच अगोदर त्या व्यक्तीला दांडक्याने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. तसा आरोपदेखील खांदवे कुटुंबीयांनी केला आहे.

प्रदीप मोटे असे या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कालिदास खांदवे, माऊली खांदवे आणि इतर तीन अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांच्या विरुद्ध विमानतळ पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहाता या गुन्ह्याचा तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून, मोटे यांची विमानतळ पोलिस ठाण्यातून थेट मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे.

ज्या दिवशी हा प्रकार घडला, त्या दिवशी मोटे हे शासकीय कर्तव्यावर नव्हते. सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोटे यांनी त्याची कार पट्रोल पंपाच्या गेटसमोरील बाजूला उभी केल्याचे दिसते. पांढरा शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने मोटे यांना गाडी बाजूला घ्या, असे तो सांगत असल्याचे दिसते आहे. पोलिसांनीदेखील फिर्यादीत तसे नमूद केले आहे. त्या वेळी मोटे यांनी, ‘मी पोलिस आहे, थांब जरा’. त्यातून त्यांच्यात बाचाबाची झाली. मोटे यांनी लाल रंगाची जर्सी व बर्मुडा घातला आहे.

गाडीचा दवाजा उघडून लाल रंगाचा शर्ट घातलेले मोटे बाहेर येतात. त्याचवेळी ते पांढर्‍या रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीची कॉलर पकडून ठेवतात. तीन ते चार मिनिटे मोटे त्या व्यक्तीच्या अंगाला झोंबताना दिसून येत आहेत. तरीदेखील ती व्यक्ती तशीच उभी आहे. काही वेळानंतर दोघांत जोरात झटापट सुरू होते.

त्यानंतर मोटे गाडीच्या डिक्कीतून काठी घेऊन येऊन त्या व्यक्तीला मारहाण करताना दिसून येत आहे. मोटे यांनी पट्रोल पंपाचा हप्ता म्हणून पाच लाख रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप खांदवे यांनी केला आहे. त्यानंतर दुसर्‍या एका चारचाकीतून काही व्यक्ती तेथे येतात आणि मोटे यांना मारहाण करतात. मोटे खाली पडतात, थोड्या वेळात ते उठून गाडीतून निघून जातात.

पोलिसाला मारहाण करणे हा प्रकार गंभीर असून, तो कधीही समर्थनीय नाही, मात्र जेव्हा एखादी व्यक्ती आपण पोलिस असल्याचा धाक जमवून नियमांना फाटा देत सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते गंभीर आहे. मोटे यांच्या म्हणण्यानुसार ते मटण विकत घेण्यासाठी तेथे गेले होते. तर खांदवे यांचे म्हणणे आहे, ते गाडीतून खालीच उतरलेच नाहीत. रविवार असल्यामुळे परिसरात गर्दी असते. तसेच पंपावर येणार्‍या ग्राहकांना अडथळा निर्माण होत होता, म्हणून मोटे यांना खांदवे यांनी विनंती केली. मात्र त्यांनी आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांना थांबण्यास सांगितले.

सवाल असा निर्माण होतो की, पोलिस असल्यामुळे मोटे यांना गाडी रस्त्यात उभी करण्याचा अधिकार दिला कोणी, सर्वसामान्यांना एक आणि पोलिसांना दुसरे नियम असे काही आहे का ? जर गाडी बाजूला घ्या म्हटले, तर त्यामध्ये एवढ्या रागाला जाण्याचे कारण काय. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी मोटे शासकीय कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांच्या अंगावर वर्दीदेखील नव्हती किंवा ते सरकारी कर्तव्य करण्यासाठी तेथे गेले नव्हते. त्यामुळे त्यांनी आपण पोलिस असल्याचा धाक मिरवण्याची गरज नव्हती, असे तेथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

…तर आदर्श कोणाचा?
हा प्रकार घडल्यानंतर विमानतळ पोलिसांनी तत्काळ कर्तव्य करत पेट्रोल पंपावरील डीव्हीआर जप्त केला. आम्हाला कोणतीही कल्पना न देता तो काढून नेला, असे बंडू खांदवे सांगतात. चार ते पाच व्यक्ती एका पोलिसाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओदेखील बाहेर आला. संपूर्ण व्हिडिओ न दाखवता त्यातील तेवढाच भाग इतरांपर्यंत पोहचला. तो व्हिडिओ पाहताच पोलिसाला किती त्वेशात मारहाण करत आहेत असे दिसून येते. मात्र संबंधित पोलिसाने वादाची सुरुवात कशी केली हे दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे पोलिसांनीच कायद्याचा धाक दाखवून गैरप्रकार केला तर सर्वसामान्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे.

 

Back to top button