नाशिक : सुधाकर बडगुजर यांची नियुक्तीच बेकायदेशीर : प्रवीण तिदमेंचा दावा | पुढारी

नाशिक : सुधाकर बडगुजर यांची नियुक्तीच बेकायदेशीर : प्रवीण तिदमेंचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करत शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची संघटनेच्या अध्यक्षपदी शिवसेनेने निवड केली. परंतु, या निवडीला तिदमे यांनी आक्षेप घेत संघटनेचा सभासदच अध्यक्ष होऊ शकतो, असे सांगत माझ्यावर आरोप करणार्‍यांनी आधी संघटनेची नियमावली वाचावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर शिंदे गटात महाराष्ट्रातून अनेक ठिकाणांहून प्रवेश केले जात आहेत. त्यात नाशिक अभेद्य असेल अशा स्वरूपाच्या आणाभाका घेण्यात आल्या. परंतु, नाशिकमधूनही तिदमे यांच्या रूपाने शिवसेनेला खिंडार पडले आहे. तिदमे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी करत स्वत:कडेच अध्यक्षपद घेतले. त्यानंतर एकाच दिवसाने घोलप यांनी अध्यक्षपदाची धुरा माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर सोपविली. परंतु, बडगुजर यांची नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचा दावा तिदमे यांनी केला आहे.

संघटनेच्या नियमावलीनुसार किमान एक वर्ष सभासद असलेला व्यक्तीच संघटनेचा अध्यक्ष होऊ शकतो, असे म्हटलेले आहे. तसेच कोणीही मला थेट अध्यक्षपदावरून हटवू शकत नाही. संघटनेची जनरल मीटिंग त्यासाठी आधी बोलवावी लागेल आणि ती सभा अध्यक्षच कॉल करू शकतो. अध्यक्षांनी कॉल केलेल्या सभेत संबंधित ठराव मताधिक्याने मंजूर झाला तरच अध्यक्षपदावरून संबंधित व्यक्ती पायउतार होऊ शकते. यामुळे संबंधितांनी आधी संघटनेच्या नियमावलीचा अभ्यास करावा आणि मगच कार्यवाही करावी, असा सल्ला तिदमे यांनी देऊ केला आहे.

संघटनेची केबिन आमच्या ताब्यात आहे. केबिन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करू. पदाधिकार्‍यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे मीच अध्यक्ष आहे.
– प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख,
शिंदे गट (शिवसेना)

हेही वाचा :

Back to top button