बेपत्ता मुलीचा शोध, www.pudhari.news
बेपत्ता मुलीचा शोध, www.pudhari.news

नाशिक : गुगल श्वानाने शोधलेल्या ‘त्या’ चिमकुलीवर अत्याचार झाल्याचे उघड

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरनगर परिसरात दहावर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. बेपत्ता मुलीच्या नातलगांसह स्थानिक नागरिक, पोलिस व श्वानपथकाने लगेचच शोध सुरू केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

आंबेडकरनगर परिसरातील एक चिमुकली शनिवारी (दि. 12) रात्रीच्या सुमारास तिच्या वडिलांसोबत फिरण्यास गेली होती. त्यानंतर चिमुकली घरी एकटीच परतली होती, तर वडील बाहेर थांबले होते. थोड्या वेळाने वडील घरात गेल्यानंतर चिमुकली घरी पोहोचली नसल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी तिचा परिसरात शोध सुरू केला. परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनीही चिमुकलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. उपनगर पोलिसांना माहिती समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. मध्यरात्री साडेबारापर्यंत चिमुकलीचा शोध न लागल्याने पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकातील 'गुगल' या श्वानाची मदत घेतली.

गुगलला चिमुकलीचे कपडे व बुटांचा वास दिल्यानंतर गुगलने चिमुकली ज्या-ज्या मार्गावरून गेली, तो मार्ग दाखवला. अखेर चिमुकलीच्या घराच्या पाठीमागील परिसरापर्यंत गुगलने मार्ग दाखवला. तेथेच चिमुकली आढळून आली. पोलिसांना व पालकांना पाहून चिमुकलीची भीती दूर झाली. पोलिसांनी चिमुकलीची प्राथमिक चौकशी करून तिचा ताबा पालकांना दिला. दरम्यान, चिमुकलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी सखोल चौकशी केली असता, संशयितास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी दिली. या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांसह पोलिसांची शोधमोहीम व गुगलने मार्ग दाखवल्याने गुन्हेगारांनी चिमुकलीस सोडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चिमुकलीचा वेळीच शोध सुरू केल्याने पुढील अनर्थ टळला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news