नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 31 मध्ये बडगुजरांचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान

नाशिक मनपा निवडणूक : प्रभाग 31 मध्ये बडगुजरांचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान

सिडको : राजेंद्र शेळके : सिडकोतील जुना प्रभाग क्रमांक 25 चा 80 टक्के व उर्वरित प्रभाग क्रमांक 24 व 28 या प्रभागांच्या काही भागांचा समावेश होऊन पाटीलनगर ते सावतानगरचा समावेश असलेला नवीन प्रभाग क्रमांक 31 तयार झाला आहे. या रचनेत विद्यमान नगरसेवकांपैकी शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर या दाम्पत्यासाठी हा प्रभाग सुरक्षित असला तरी विद्यमान शिवसेनेचे नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी मात्र नवीन प्रभाग क्रमांक 31 मध्ये न लढता विकासकामे केलेल्या नवीन प्रभाग क्रमांक 32 मध्ये लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपच्या विद्यमान नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांची काहीशी अडचण झाली आहे. परिणामी त्यांनी शेजारील प्रभागात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन प्रभाग क्रमांक 31 मध्ये विकासकामांच्या जोरावर असलेले शिवसेनेचे महानगरप्रमुख व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचा बालेकिल्ला भेदण्यासाठी विरोधी पक्षापुढे आव्हान आहे.

शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर हे 2007 च्या निवडणुकीत विजयी झाल्यापासून सलग तीन वेळा निवडून आल्याने 15 वर्षांपासून या प्रभागात शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व नगरसेविका हर्षा बडगुजर या दाम्पत्याने प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने नागरिकही त्यांच्यासमवेत आहेत. नवीन प्रभाग क्रमांक 31मध्ये सिडकोतील सुमारे 80 टक्के मतदार आहे. उर्वरित 20 टक्के भाग कॉलनी भागाचा समावेश आहे. या प्रभागात खानदेश, कसमाबरोबरच सातारा, कोल्हापूर, सांगली या साकोसा भागातील मतदारांसह स्थानिक नागरिक आहेत. मनपा निवडणुकीत हे मतदान निर्णायक ठरतात.

असा आहे प्रभाग 31
उंटवाडी, पाटीलनगर, सावतानगर, पेठे विद्यालय, जीएसटी भवन, त्रिमूर्ती चौक, शिवनेरी गार्डन, ओमकार हाईट्स, लासुरे हॉस्पिटल परिसर.

प्रमुख इच्छुक उमेदवार
शिवसेना : नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, भूषण देवरे, योगेश गांगुर्डे, प्रकाश अमृतकर.
काँग्रेस : केशव पाटील.
राष्ट्रवादी : मुरलीधर भामरे, अमित खांडे.
भाजप : अ‍ॅड. अतुल सानप, सारिका सानप.
मनसे : सावित्री रोजेकर, वैष्णवी रोजेकर, राहुल पाटील, मनोज सावंत, तुषार साळुंके, नितीन अमृतकर, शोभना शिंदे.

प्रभागातील वैशिष्ट्ये
पाटीलनगर येथे सात एकर जागेत अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडांगण, तसेच जॉगिंग ट्रॅक. बाजूलाच संत गाडगे महाराज उद्यान.
रायगड चौक येथे अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त शाळा इमारत. यात 18 क्लासरूम, 2 हॉल, कार्यालय, मैदान.
प्रभागात 80 टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण.
प्रभागात उघड्यावरील विद्युत तारा 100 टक्के भूमिगत.
प्रभागातील मुख्य रस्ते व चौकांमध्ये सीसीटीव्ही.

नागरिक म्हणतात…

शवनेरी गार्डन परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे आहेत. महापालिकेने रस्ता तयार करावा अथवा खड्डे बुजवावे.
– हरीश चव्हाण

प्रभागातील उंटवाडी पूल ते दिव्या अ‍ॅडलॅब-पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. तसेच रस्त्यालगतच त्रिमूर्ती चौक भागात शाळा आहे. भविष्याचा विचार करून राजकारण बाजूला ठेवून विकासकामांना प्राधान्य देत उंटवाडी पूल ते दिव्य अ‍ॅडलॅबपर्यंत उड्डाणपूल झाला पाहिजे. – शिवाजी निकम

प्रभागात उघड्यावर विद्युत तारा होत्या. त्यामुळे पतंग उडविताना शॉक लागायचे व जखमी होण्याचे प्रकार होत होते. या उघड्या वीजतारा भूमिगत केल्याने सुरक्षितता वाढली आहे. – श्यामराव महाजन

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news