नाशिक (गोंदेगाव) : चंद्रकांत जगदाळे
'दैव देतं आणि कर्म नेतं', या उक्तीचा प्रत्यय गोंदेगावकर गेल्या काही वर्षांपासून घेत आहेत. शिवारात प्रवेश करताना तुडुंब भरलेली नदी बघितली की, गोंदेगावकरांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत नसेल, असा गैरसमज कुणाचाही होतो. परंतु, खारे पाणी पदरी पडल्याने या पाण्याचे करायचे तरी काय? असा सवाल महिलावर्गाकडून उपस्थित झाला नाही, तर नवल वाटण्यासारखे आहे.
खारट पाणीपुरवठ्याची परिस्थिती गोई नदीला पाणी येण्यापूर्वी असते. मात्र, नदीपात्र पाण्याने भरले की, अशुद्ध पाण्याचा पुरवठा गावकर्यांना होतो. त्यामुळे शेतशिवारातील सुजलाम सुफलाम स्वरूपातील लक्ष्मीच्या चेहर्यावर 'हसू' असले, तरी घराघरातील लक्ष्मीच्या डोक्यावरील हंडा उतरत नसल्याने तिच्या चेहर्यावर 'आसू' आहेत. गोंदेगावकरांच्या नशिबी असलेला अशुद्ध पाणीपुरवठा दूर करण्यासाठी तातडीने शासनदरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
गोंदेगाव ग्रामपंचायतीची सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी विहीर गोई नदीमध्ये 50 वर्षांपूर्वी खोदली होती. विहिरींची लांबी रुंदी इतकी प्रचंड असल्याने सात-आठ वर्षांपूर्वीचा दुष्काळ वगळता, या विहिरीने गोंदेगावकरांची वणवण होऊ दिली नाही. दररोज पाणीपुरवठा करण्याची क्षमता या विहिरीची आहे. ग्रामपंचायत लेखी 250 पेक्षा जास्त घरे आणि तीन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे.
खासगी
विहिरींवर मदार
तहान भागविण्यासाठी गावामध्ये सहा स्रोत आहेत, त्यात एक विहीर आणि पाच हातपंप आहेत. त्यातील एक हातपंप माध्यमिक शाळा वापरते, आदिवासी वस्तीमधील एक हातपंप नादुरुस्त आहे. उर्वरित तीन वापरात आहेत. त्यांपैकी समाज मंदिरासमोरील हातपंप वगळता, इतर कोणत्याही हातपंपाचे पाणी नागरिक पित नाहीत. तर, उत्तरेला गावालगत असलेल्या खुशालचंद दगडे या शेतकर्यांच्या शेतातील पाणी पिणार्यांची संख्या मोठी आहे.
जलजीवन
मिशनवर भिस्त
पिण्याचे पाणीपुरवठ्याबाबत जलजीवन मिशन योजनेवर ग्रामपंचायतीची भिस्त आहे. उपलब्ध माहितीनुसार, एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गोंदेगावसाठी या योजनेतून खर्च होणार आहे. त्यामध्ये स्वतंत्र विहीर, स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर, स्टार्टर रूम, विद्युत पंप संच, स्वतंत्र जलकुंभ, सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी विहीर ते जलकुंभ अशी मुख्य पाइपलाइन, गाव अंतर्गत पुरवठा करणारी पाइपलाइन, प्रत्येक घरासाठी नळजोडणी इतकी कामे नवीन होणार आहेत.
गावासाठी जलस्त्रोत
विहिर 1
हातपंप 05
नादुरुस्त पंप 01
पिण्यायोग्य 01
पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रथम प्राधान्य द्यायला हवे. सर्वच नागरिक सधन नसल्याने विकतचे पाणी प्रत्येक घरात घेतले जाईलच असे नाही. गरीब कुटुंबात नाइलाजाने दूषित पाणी प्यायले जाते. परिणामी, आजारी पडणार्यांची संख्या गावात वाढते आहे.
– बापू भोसले,
रहिवासी, गोंदेगावजलजीवन मिशन अंतर्गत पाणी समस्या कायमची निकाली निघेल. या योजनेत नागरिकांना घरापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. सोबतीला फिल्टर प्लांटचे काम हाती घेतले असून, लवकरच ग्रामस्थांना अल्पदरात शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.
– शुभांगी सुरसे,
ग्रामसेविकाखारे पाणी असल्यामुळे भांड्यांवर थर जमा होतो. यावरून समजते की, हे पाणी आरोग्याला किती घातक आहे. जलजीवन मिशन योजनेला मूर्तरूप येण्यात अवकाश असला, तरी सध्या खारट पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यायला हवा.
– दीपाली जगदाळे, महिला गोंदेगाव
योजनांवर पाण्यासारखा पैसा खर्च
ग्रामपंचायत फिल्टर प्लांट बांधणीसाठी अंदाजे चार लाख रुपयांचा निधी गृहीत धरला गेला आहे. पाइपलाइन आणि जलकुंभ दुरुस्तीसाठी दोन टप्प्यांत साडेपाच लाख, जलजीवन मिशनमध्ये एक कोटीपेक्षा जास्त निधी खर्च होण्याची शक्यता आहे.