कोल्हापूर : पन्हाळा मुख्य रस्ता उद्यापासून सुरू | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळा मुख्य रस्ता उद्यापासून सुरू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय झालेल्या पन्हाळा येथील मुख्य रस्ता गुरुवार (दि. 5) पासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे; तर संपूर्ण रस्ता लवकरच सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.

गेल्यावर्षी पावसाळ्यात पन्हाळा-बुधवार पेठ या मार्गावरील मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्ता खचला होता. संपूर्ण रस्ताच वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. हा रस्ता समूळ खचल्याने तो दुरुस्त करणे कठीण बनले होते. सुरुवातीचे सहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आता नऊ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र, रस्त्याअभावी झालेली पन्हाळ्याची आर्थिक कोंडी यामुळे दूर होणार असून, पर्यटकांना पन्हाळगडाचे दर्शन घेणे आता शक्य होणार आहे. या रस्त्याचे जिओ ग्रेड पद्धतीने काम करण्यात आले आहे. ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. गुरुवारी हा रस्ता सुरू केला जाणार असून, पहिल्या टप्प्यात अर्ध्या रस्त्यावरूनच दुहेरी वाहतूक सुरू ठेवली जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रस्ता वाहतुकीला खुला केला जाणार आहे. हा रस्ता सुमारे 85 ते 90 फूट खचला होता. त्यामुळे तळापासून वरपर्यंत हा रस्?ता बांधण्यात येत आहे. एकाचवेळी संपूर्ण रस्त्याचे काम करणे अवघड असल्याने ते तीन टप्प्यांत करण्यात आले. प्रत्येक टप्पा 20 ते 22 फुटांचा करण्यात आला आहे. आता तिसरा टप्पा पूर्णत्वास आला आहे. तिन्ही टप्पे पूर्ण झाल्याने आता रस्त्याचे बुधवारी काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारपासून रस्ता सुरू होईल. पन्हाळा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. रस्ता बंद असल्याने पर्यटकांची व स्थानिक नागरिकांची झालेली कोंडी आता दूर होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button