भोंग्याला भोंग्याने उत्तर द्या; राज ठाकरे यांचे आवाहन | पुढारी

भोंग्याला भोंग्याने उत्तर द्या; राज ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
पोलिसांच्या कारवाईला न जुमानता राज ठाकरे यांनी मोठ्या आवाजातील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आता सर्वांनाच साद घातली आहे. भोंग्याला भोंग्याने उत्तर द्या. 4 मे रोजी जेथे जेथे भोंगे अजान, बांग देतील, तेथे तेथे आपण भोंग्यांवर हनुमान चालिसा लावावी, असे आवाहन करत त्यांनी मनसैनिकांसह देशातील जनतेलाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे : जेथे भोंगे अजान, बांग देतील, तेथे भोंग्यांवर हनुमान चालिसा लावा.

राज यांनी मंगळवारी एकीकडे पत्राद्वारे भावनिक आवाहन करत, दुसरीकडे राज्यात सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मशिदींवरचे भोंगे 4 मेपर्यंत उतरवण्याबाबत सरकारला सांगितले होते. परंतु, याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. भोंग्यांच्या आवाजामुळे होणार्‍या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले असताना मशिदींवर भोंगे सुरूच असतात. तसेच ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा, याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. सर्व भोंगे आणि बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. रस्त्यांवर नमाज पठण करणे आणि वाहतूक कोंडी करणे, हे कोणत्या धर्मात बसते, असा सवाल करत राज यांनी मुस्लिम धर्मीयांना हा सामाजिक विषय असल्याची समज दिली आहे. या विषयाला धार्मिक वळण दिलात; तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल. आम्हाला देशातील शांतता बिघडवायची नाही. परंतु, आपण धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल; तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारकडून अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना परवानग्या दिल्या जात असल्याबद्दल राज यांनी संताप व्यक्‍त केला आहे. ते म्हणाले, परवानगी देणारच असाल; तर हिंदू मंदिरांवरही भोंगे लावण्याची आम्हाला परवानगी द्यायलाच हवी, अशी भावना त्यांनी मांडली.
हिंदूंच्या सणांना सायलेन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्वप्रकारच्या अटी-शर्तींच्या नावाखाली मर्यादा घालायच्या; परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत. हे धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे सांगत राज यांनी भोंग्यांविरोधात आपला कार्यक्रम जाहीर केला.

Back to top button