Nashik : घोटी-सिन्नर फाटा वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा
सलग तीन-चार दिवसांच्या सुट्यांमुळे नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. घोटी-सिन्नर फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. घोटी-सिन्नर मार्ग वाहतूक कोंडीने दिवसभर ठप्प झाला होता.
गतमहिन्यात समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शिर्डी येथे झाले. शिर्डी ते भरवीर हे ८० किलोमीटचे अंतर असून इगतपुरी तालुक्यातील भरवीर ते घोटी हे अंतर साधारण अर्ध्या तासाचे आहे. नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे अंतर सुमारे ५२० किलोमीटर आहे. या समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई असा प्रवास सुखकर होणार आहे. मात्र भरवीर ते घोटी हा २५ किलोमीटरपर्यंत सिंगल रस्ता असून या रस्त्यावरून मुंबईकडे जाणारी वाहने सिन्नर फाटा येथून जातात. घोटी-सिन्नर फाट्यावरही उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलांच्या कामामुळे नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांची या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. हीच वाहतूक पुढे घोटी टोलनाक्यावर सरकताच तेथेही वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
भरवीर येथील समृद्धी महामार्ग सुरू करण्यापूर्वी अपघात व वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या होत्या. घोटीपासून मुंबई-आग्रा महामार्गावरून सिन्नरकडे जाणारा मार्ग आहे. पण मधल्या २५ किलोमीटरच्या सिंगल रस्त्यावरील वाहतूक कोंडी कशी रोखता येईल, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
हेही वाचा :

