सातारा : पर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती; मुख्यमंत्र्यांची ग्वाही | पुढारी

सातारा : पर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अत्यंत चांगला विकास आराखडा सादर केला आहे. या विकास आराखड्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षमता वृद्धिंगत होणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा हा अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गसंपदा लाभलेला संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याला 110 किलोमीटरचा कोयनेचा बॅकवॉटरचा पट्टा लाभला आहे. या जिल्ह्यात जंगले आहेत, प्राणी आणि पक्षी अभयारण्य आहे. मंदिरे, गड, किल्ले, धबधबे, पठारे आहेत. अशा स्थितीत पर्यटनाचा विकास झाल्यास जिल्ह्यातून नोकरी, धंद्यासाठी बाहेरगावी जाणार्‍या युवकाला आपल्याच मायभूमीत रोजगार मिळेल. या दृष्टीने जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीच्या क्षमता ओळखून अत्यंत चांगला आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. रोजगारानिमित्त इतर शहरात गेलेले तरुण पुन्हा आपल्या मायभूमीत परत यावेत, या उद्देशाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाच्या माध्यमातून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अनेक वर्षापासून रखडलेल्या तापोळा पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बामणोली ते दरे आणि आपटी ते तापोळा अशा दोन पुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी हे पूल अत्यंत महत्त्वाचे ठरतील आणि याचा फायदा पर्यटन वाढीलाही होईल. महाबळेश्वर ते तापोळा रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण सुरू आहे. मुनावळे येथे पर्यटकांसाठी आकर्षण स्थळे विकसित करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. रोजगारासाठी युवकांना उद्युक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Back to top button