नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गोरक्षकांनी सतर्कपणे दिलेल्या माहितीच्या आधारे दोन दिवसांत पोलिसांनी आठ गोवंश कत्तलीपासून वाचविले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, गोवंश, वाहनासह 12 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, बापू सूर्यवंशी, विलास जगताप यांनी ही कामगिरी केली. रविवारी (दि.11) एक पिकअप (एमएच 41, ए. यू. 5180) तीन गोवंश घेऊन लखमापूर गावाकडून निंबोळा, डोंगरगाव, सौंदाणेमार्गे मालेगावच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. राष्ट्रीय महामार्गावरील पाटणे फाट्याजवळ सदरचे वाहन आल्यानंतर चौकशी करण्यात आली. संबंधिताने ही जनावरे मनमाड चौफुलीच्या पुढे रईस कसायाकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. याबाबत तालुका पोलिसांना सूचित केले गेले. त्यानुसार संशयित अमोल सुदाम पवार व दत्तू बापू वाघ (दोघे रा. लखमापूर) यांच्या विरुद्ध शिर्के यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 सह इतर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 20 हजारांचे गोवंश आणि 10 लाखांचे वाहन जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलिस नाईक सचिन गायकवाड करीत आहेत. याचप्रमाणे सोमवारीदेखील (दि.12) पाटणे शिवारात कारवाई करण्यात आली. एम. एच 01, एल. ए. 3170 या पिकअपमधून पाच गायींची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली. पाटणे गावापुढे निंबोळा रोडवरील दौलतनगर चौफुलीजवळ गेले असता झाडाझुडपांमध्ये सदरचे अपघातग्रस्त वाहन मिळून आले. त्यात गायी व वासरू निर्दयीपणे बांधलेल्या अवस्थेत मिळून आले. त्या ठिकाणी उभे असलेल्या चार व्यक्तींची चौकशी केली असता त्यातील तिघे गर्दीचा फायदा घेऊन मक्याच्या शेतात पळून गेले. संशयित शेख राहील शेख मेहबूब याच्यासह वाहन व जनावरे ताब्यात घेण्यात येऊन त्याच्यासह अज्ञात तिघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.