पुणे : लम्पी त्वचारोगावरील लसीकरण मोफत | पुढारी

पुणे : लम्पी त्वचारोगावरील लसीकरण मोफत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात लम्पी त्वचारोग हा केवळ गायी, म्हैसवर्गातील जनावरांमध्ये होत आहे. हा आजार जनावरांपासून माणसात संक्रमित होत नाही. त्यामुळे मानवी आरोग्यास कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे. लम्पी रोगावरील जनावरांचे लसीकरण राज्य सरकारकडून मोफत करण्यात येत असून, शेतकर्‍यांनी घाबरून न जाता वेळीच लसीकरण व औषधोपचार करून जनावरांची काळजी घेतल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो.

लम्पीबाबत राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने सुरुवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे राज्यात जनावरांच्या मृत्यू दराचे प्रमाण कमी राखण्यात आतापर्यंत यश आल्याचेही ते म्हणाले. पशुसंवर्धन आयुक्तालयात मंगळवारी (दि. 13) आयोजित पत्रकार परिषदेत सिंह म्हणाले, सद्यस्थितीत लम्पीचा 21 जिल्ह्यांत प्रादुर्भाव झाला असून, 2 हजार 664 पशुधन बाधित झाले आहे. त्यापैकी औषधोपचाराने 1 हजार 520 पशुधन बरे झाले असून, 43 जनावरे मृत झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात मंगळवारी आणखी पाच लाख लसी उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाकडून 50 लाख लसींच्या उपलब्धतेसाठी निविदा प्रसिद्ध होत आहेत. पुढील आठवड्यात ती लसही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लसीचा राज्यात कोठेही तुटवडा नसल्याचेही त्यांनी सांगितले.

अडचण आल्यास संपर्क साधा
लम्पी रोगाबाबत शेतकर्‍यांना क्षेत्रियस्तरावर अडचण आल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-2330-418 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल क्रमांक 1962 वर संपर्क साधावा. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही नियंत्रण कक्ष तयार केलेले आहेत.

शेळी-मेंढी बाजार पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न
लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव हा गायी-बैलांमध्ये अधिक दिसून येत आहे. बाजार समित्यांमध्ये गायी-म्हशींचे बाजार बंद करण्यात आले आहेत. लम्पी त्वचारोग हा शेळी-मेंढ्यांना होत नाही. त्यामुळे शेळी-मेंढ्यांचे बाजार बंद केले असतील तर ते पूर्ववत सुरू करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना कळविण्यात येईल.

जनावरांचे दूध शंभर टक्के सुरक्षित
लम्पी त्वचारोग हा गायीच्या दुधातून माणसात येत नाही. अशा जनावरांचे दूध हे शंभर टक्के सुरक्षित आहे. लम्पी स्कीन हा रोग डास, माशी, गोचिड इत्यादींपासून पसरतो. जनावरे आजारी पडल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरे घेऊन औषधे द्यावीत व लसीकरण करावे. लम्पी रोग हा शंभर टक्के बरा होणारा आहे. जनावरे खासगी दवाखान्याकडे घेऊन जाऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Back to top button