नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनधिकृत पुतळा काढल्याने तणाव

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनधिकृत पुतळा काढल्याने तणाव
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील जयभवानी रोडवरील महापालिकेच्या उद्यानात अनधिकृतपणे बसविलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मंगळवारी (दि. १३) मध्यरात्री तीनच्या सुमारास पोलिस व महापालिका प्रशासनाने हटविल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. पुतळा पुन्हा बसवावा, अशी मागणी करून आंबेडकर अनुयायांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, बुधवारी ( दि. १४ ) दुपारी नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढला जाईल, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

जयभवानी रोडवर मनपाच्या जागेत उद्यान व जलुकंभ विकसित करण्यात आलेले आहे. उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी छत्रीच्या आकाराचे गजिबो बांधण्यात आले आहे. उद्यानाचे ठेकेदार प्रदीप गायकवाड व मजूर उद्यानात काम करण्यासाठी गेले असता त्यांना रात्री दोन-तीन फुटांचा विटांचा चबुतरा बांधून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविल्याचे आढळले. गायकवाड यांनी उद्यान निरीक्षक एजाज शेख यांना माहिती दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार शेख यांनी उपनगर पोलिस ठाण्यात पत्र दिले. विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, एजाज शेख, उपनगरचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी संजय भालेराव म्हणाले की, ही जमीन महापालिकेने आमच्याकडून उद्यानासाठी घेतली आहे. मी पुतळा बसवून पूजा केली आहे. महापालिका उद्यानात अतिक्रमण करून अनधिकृत पुतळा बसवल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संजय भालेराव व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रशासनाने मध्यरात्री हा अनधिकृत चबुतरा व पुतळा हटविला. भालेराव मळ्यातील रहिवासी व आंबेडकर अनुयायांना ही बाब सकाळी समजताच त्यांनी उद्यानात येऊन घोषणा देत आंदोलन सुरू केले. सहायक पोलिस आयुक्त सिध्देश्वर धुमाळ, वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, दुय्यम निरीक्षक भालेराव यांनी फौजफाट्यासह धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्ते पुतळा पुन्हा त्याच जागी बसविण्यावर ठाम होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा बसविण्यासाठी परवानगी दिल्यास पुतळा पुन्हा या जागी उभारण्याचे आश्वासन उपआयुक्त मुंढे यांनी दिले.

आंदोलनात माजी नगरसेविका सरस्वती भालेराव, संजय भालेराव, शशिकांत उन्हवणे, समीर शेख, अमोल पगारे, पंकज भालेराव महेश सुकेणकर, इंद्रिजत भालेराव, किशोर भालेराव, विकास भालेराव, सिध्दांत पवार, शशी सुरवाडे, किरण शेजवळ, गौतम पवार, नीलेश भालेराव, राहुल बागूल, अमिश भालेराव आदींस नागरिक सहभागी झाले होते. पोलिसांनी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अनधिकृत पुतळे काढण्यासंदर्भात शासनाचे जे काही नियम आहेत, त्याप्रमाणे कारवाई केली आहे. कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून तसेच जिल्हाधिकारी यांची रितसर परवानगी असेल तर पुतळा बसविण्यास हरकत नाही.
– विजय मुंढे, महापालिका उपआयुक्त

आम्ही ६ डिसेंबरला पुतळा उभारला होता. रात्री १.३० च्या सुमारास महापालिका प्रशासन व पोलिसांनी पुतळा काढून घेतला. यासंदर्भात आवाज उठवणाऱ्या भीमसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचे मोबाइल जप्त केले. पुतळा जोपर्यंत पुन्हा बसवत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार आहोत.

– संजय भालेराव, स्थानिक नागरिक

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news