नगर : शाळा तपासणीसाठी भरारी पथक ! | पुढारी

नगर : शाळा तपासणीसाठी भरारी पथक !

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण विभागात सुसूत्रता आणण्यासाठी तसेच गुणवत्ता वाढीसाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आस्थापना व योजना विषय कामकाजांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची नियुकती केली असून, संबंधित पथक हे थेट शाळेत जावून आता दप्तर तपासणी करणार असल्याचेही समजते.  जिल्हा परिषदेत वैद्यकीय बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या कर्मचार्‍याला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोषण आहारातील पूरक आहार गायब असल्याचीही मोठी चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी पाटील यांनी हाती घेतलेल्या आस्थापना व योजनाविषय कामकाजांची तालुकास्तरावर तपासणीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

प्रत्येक तालुक्यासाठी सहा दिवस

या मोहिमेला श्रीगोेंद्यापासून सुरुवात झाली आहे. शेवगाव 14 डिसेंबर, नेवासा 21 डिसेेंबर, पाथर्डी 28 डिसेंबर, पारनेर 4 जानेवारी,राहाता 11 जानेवारी, श्रीरामपूर 18 जानेवारी, कोपरगाव 25 जानेवारी, संगमनेर 1 फेब्रुवारी, अकोले 8 फेब्रुवारी, कर्जत 15 फेब्रुवारी, जामखेड 22 फेब्रुवारी, नगर 1 मार्च, आणि राहुरी 8 मार्च अशा प्रमाणे ही तपासणी असणार आहे.

कोण कोण असेल भरारी पथकात..!

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,उपजिल्हाशिक्षणाधिकारी विलास साठे, समग्रचे लेखाधिकारी रमेश कासार, कक्ष अधिकारी, विस्तार अधिकारी आदींचे हे पथक असणार आहे. हे पथक शाळांमध्ये जावून संबंधित दप्तर तपासणी करणार आहे.

आस्थापनाची होणार तपासणी

या तपासणीत प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे, प्रलंबित दोषारोप प्रस्ताव, न्यायालयाकडील प्रलंबित प्रकरणे, वरिष्ठ, निवड श्रेणी प्रस्ताव, प्रलंबित वैद्यकीय देयके अभिलेखे, कर्मचारी सेवा पुर्नविलोकन कार्यवाही, गटशिक्षणाधिकार्‍यांची दैनंदिनी, आवक-जावक गोषवारे, लोकसेवा हक्क्क अधिनियम फलक व कार्यवाही, स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल, शिक्षक संवाद दिन कार्यवाही, सेवापुस्तके तपासणी, ऑडीट पेरा, दैनंदिनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची दैनंदिनी पाहिली जाणार आहे.

समग्र शिक्षा अभियानावरही नजर

शाळेतील मोफत पाठयपुस्तक वितरण रजिस्टर, सन 2019-20, 2020-21, 2021-22 प्राप्त अनुदानेे, कॅशबूक, अखर्चित निधी यामध्ये गणवेश खरेदी, शाळा अनुदान, गट साधन व समूह साधन ेकेंद्राचा खर्चही तपासला जाणार आहे. यु-डायस प्लस नोंदणी, पीएम श्री शाळा, मॉडेल स्कूल ( 16 शाळा खोली बांधकामे) व जिल्हा नियोजनमधून बांधकाम आढावा, स्थलांतरीत विद्यार्थी सर्वेक्षण, दाखल पात्र विद्यार्थी, तालुकास्तरीय बैठका, विद्यार्थी आधार नोंदणी याबाबत पथकाकडून तपासणी होणार आहे.

गुणवत्तेची होणार चाचपणी !

शाळांमध्ये तपासणी पथक गेल्यानंतर ते तेथील गुणवत्ताही पाहणार आहेत. शाळा भेटी, शाळा भेट प्रपत्र, पाच शाळांची तपासणी, तालुकास्तर शिष्यवृत्ती सराव संख्या, 0 टक्के निकालाच्या शाळांवर केलेली कार्यवाहीचीही माहिती घेतली जाणार आहे.

शालेय पोषण आहार  योजनेचीही चौकशी करणार

शालेय पोषण आहार, त्याचे दप्तर, तसेच पालक, विद्यार्थ्यांचे जबाबही हे पथक तपासणार आहे. पूरक आहाराचाही यावेळी आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय राजीव गांधी सानुग्रह अनुदान, प्रलंबित प्रस्ताव, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती अभिलेखे, सावित्रीबाी दत्तक पालक योेजना अभिलेखे याबाबतही पथक आढावा घेणार आहे.

तपासणीत हाती काही लागणार का?

जिल्ह्यातील पोषण आहार आजही साशंकतेचा विषय आहे. पूरक आहार मिळत नसतानाही शिक्षण विभागाच्या अहवालात ऑल ईज वेल चित्र भासविण्यात आले आहे. क्रीडांगणाचा निधी समग्रच्या खात्यात येवूनही मुख्याध्यापकांचे तोंडावर बोट आहे, गणवेश खरेदीच्या निधीतूनही कोणत्या दर्जाचे कापड खरेदी केले गेले, यावरही नियंत्रण नाही, त्यामुळे एकीकडे प्रशासनच पोखरल्याची चर्चा असल्याने नेमके या तपासणीत काय हाती लागेल, हाही चर्चेचा विषय असणार आहे.

Back to top button