पाथर्डीत जनावरांची चोरी ; पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

पाथर्डीत जनावरांची चोरी ; पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथील शेतकरी अनिल पांडुरंग दौंड व हरीभाऊ तुळशीराम पडळकर यांच्या जनावरांची अज्ञात इसमाने चोरी केल्याची घटना घडली असून दौंड यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी पाथर्डी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि.12 डिसेंबर रोजी रात्री अनिल दौंड यांनी जनावरांना चारा टाकला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी सहा वाजता दौंड हे घराजवळील जनावरांच्या गोठ्यात झाडलोट करण्यासाठी गेले होते. त्यावेळी गोठ्यात एक गावरान गाय व एक गावरान गोर्‍हे दिसले नाही. तेव्हा दौंड यांनी शोध घेतला असता ते मिळून आले नाही.

तसेच तोंडोळी गावातलीच हरीभाऊ तुळशीराम पडळकर यांचेही रात्रीच्या वेळी दोन गावरान गायी चोरी गेल्याची घटना घडली आहे. शेतकर्‍याच्या पशुधनावरती चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. सध्याच्या लंम्पी आजारातून जनावरांना वाचवण्यासाठी शेतकर्‍याला अर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. त्यात आता पशुधन चोरीचे नवे संकट येऊ घातल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील पोलिस प्रशासनाने अशाप्रकारे जनावरे चोरणार्‍या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे.

कत्तलाखान्यात जनावरांची विक्री ?

गेल्या काही दिवसांपासून शहरातील व तालुक्यातील मोकाट जनावरांच्या संकेत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच तालुक्यातील मोकाट जनावरे तसेच शेतकर्‍यांच्या जनावरांच्या चोर्‍या सुरू आहेत. संबंधित जनावरे चोरून कत्तलखान्याकडे त्यांची विक्री होत असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Back to top button