राज्यात लवकरच ७० हजार कोटींचे प्रकल्प | पुढारी

राज्यात लवकरच ७० हजार कोटींचे प्रकल्प

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मराठवाडा, नाशिक, पुणे आणि विदर्भात सुमारे ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या उद्योगांमुळे राज्यात सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावा उद्योग विभागाने केला आहे. पुणे येथे १० हजार कोटींचा देशातला पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प साकार होणार आहे. नाशिकमध्ये रिलायन्स लाईफ सायन्स कंपनीची ४२०६ कोटींचा प्रस्तावित उद्योग उभारला जाणार आहे. गडचिरोलीत वीस हजार कोटींचा स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण आहे. उद्योगांना सवलत देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांची गरज लक्षात घेऊन औद्योगिक तंत्रज्ञान विकसीत करणे आवश्यक आहे. राज्यातील उद्योग घटकांनी केलेल्या मागण्या आणि त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशींचा विचार करुन या उद्योग घटकांना प्रोत्साहन अनुदान तसेच अन्य मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत राज्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित तसेच अविकसित असलेल्या भागांमध्येही मोठ्या उद्योगांना चालना मिळावी व त्याबरोबरच या उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने मोठे निर्णय घेतले.

पुण्यात महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल्स ही कंपनी १० हजार कोटी रुपयांचा देशातील पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प सुरू होणार आहे. या माध्यमातून राज्यामध्ये विदेशी गुंतवणूक होणार आहे. व्होक्सवॅगन यांच्याबरोबर तंत्रज्ञान विषयक तसेच पुणे या ठिकाणी तंत्रज्ञान, संशोधन व विकास संदर्भात प्रोटोटाईप बनविण्यात येणार आहे. यामुळे राज्यात ईलेक्ट्रिक व्हेईकल निर्मिती संदर्भात बौद्धिक संपदा तयार होत असून त्याची व्याप्ती मेड इन महाराष्ट्र अशी होईल. या प्रकल्पामुळे सभोवतालच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सहयोगी उद्योगांची निर्मिती होईल.

पुण्यात निप्रोफार्मा पॅकेजिंग इंडीया ही कंपनी नवीन तंत्रज्ञानावर आधारीत १ हजार ६५० कोटीची गुंतवणूक करणार आहे. त्या माध्यमातून दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नाशिकमधील रिलायन्स लाईफ सायन्स कंपनीच्या ४ हजार २०६ कोटी प्रस्तावित गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली आहे. ही कंपनी प्लाझा प्रोटीन, व्हॅक्सिन आणि जीन थेरपी इत्यादी जीवरक्षक औषधांची निर्मिती करणार आहे.

Back to top button