नाशिक : पार्किंगमध्ये व्यवसाय थाटणार्‍यांवर बडगा; नगरनियोजन विभाग करणार सर्व्हे

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news
नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील बहुतांश इमारतींच्या पार्किंगमध्येच अनेकांनी व्यवसाय थाटलेले असून, या व्यावसायिकांवर आता मनपाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील व्यावसायिक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरनियोजन विभागाला दिले असून, पार्किंगच्या जागेचा जर व्यावसायिक वापर होत असेल, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाहनतळांच्या अपुर्‍या जागांमुळे रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभी केली जाणारी वाहने आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी ही नाशिक शहरातील प्रमुख समस्या झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहात आहेत. प्रामुख्याने व्यावसायिक वापराच्या इमारतींची संख्या वेगाने वाढत आहे. जीवनमान उंचावल्याने शहरातील वाहनधारकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु, वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत शहरामध्ये वाहनतळांची सुविधा उपलब्ध नाही. प्रामुख्याने कॉलेजरोड, मेनरोड, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा अशा बाजारपेठांच्या ठिकाणी ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. व्यावसायिक वापराच्या इमारतींमध्ये नियमानुसार वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे, हे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक आहे. इमारत बांधकाम परवानगी घेताना तसेच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेताना संबंधित बांधकाम व्यावसायिक वाहन पार्किंगसाठी जागा दर्शवितात. मात्र बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर वाहन पार्किंगसाठी असलेल्या जागेचाही व्यावसायिक वापर सुरू होतो.

शहरातील व्यावसायिक वापराच्या अनेक इमारतींमध्ये बेसमेंट पार्किंगसाठी दर्शविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात त्या जागेचा व्यावसायिक वापर सुरू असल्याची अनेक उदाहरणे आहेत. शहरातील काही बड्या मॉलमध्ये तर वाहन पार्किंगच्या नावाखाली अवैध वसुली सुरू आहे, तर काही इमारतींच्या तळघरांमध्ये पाणी साचलेले असल्याने तेथे वाहने पार्क करण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. अशा इमारतींचे तळघर डासांच्या उत्पत्तीचे केंद्र झाले आहेत. शहरातील एम.जी. रोडवरील स्टेडियम कॉम्प्लेक्समधील इमारती याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. मात्र, यामुळे वाहनधारकांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागत असल्याने वाहनतळांचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिक इमारतींचे सर्वेक्षण करून पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर करणार्‍यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी नगरनियोजन विभागाला दिले आहेत.

फुटपाथवर थाटले गॅरेज : शहरात स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथचा वापर गॅरेजमालक वाहने ठेवण्यासाठी करत असल्याचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या निदर्शनास आले आहे. फुटपाथचा वापर गॅरेजसाठी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news