अठ्ठेचाळीस पादचार्‍यांचा हकनाक बळी, सहा महिन्यांत 165 नागरिकांचा अपघाती मृत्यूू | पुढारी

अठ्ठेचाळीस पादचार्‍यांचा हकनाक बळी, सहा महिन्यांत 165 नागरिकांचा अपघाती मृत्यूू

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील वाहतूक ‘सुरक्षित’ म्हणता येत नसली, तरी 2016 पासून 2019 पर्यंत पुण्यातील रस्ते अपघातातील मृतांची संख्या कमी होताना दिसत होती. आता मात्र त्यात मोठी वाढ होत असून, मागील सहा महिन्यांत तब्बल 165 नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक 98 दुचाकीचालकांसह 48 पादचार्‍यांचा समावेश आहे.कोरोना काळात अपघाती मृत्यूंची 250 पासून 206 पर्यंत खाली आली, मात्र आता ती पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोना कालावधीनंतर अपघातांची संख्या पुन्हा सात वर्षांतील उच्चांक गाठण्याची शक्यता ‘सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट संस्थे’कडून व्यक्त करण्यात आली आहे.

यातच बेसावध पादचारी मोठ्या प्रमाणावर अपघातांचे बळी ठरताना दिसत आहेत. मागील साडेपाच वर्षांत तब्बल 381 पादचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश पादचारी रस्ता ओलांडताना, रस्त्याच्या कडेने चालताना वाहनांनी उडविल्यामुळे मृत्यू पावले आहेत. 2016 मध्ये 87 मृत्यू, 2017 आणि 2019 मध्ये प्रत्येकी 64, 2020 या कोराना कालावधीत 34, 2021 मध्ये 84, तर चालू वर्षाच्या सहा महिन्यांमध्ये 48 पादचार्‍यांना अपघातादरम्यान आपला जीव गमवावा लागला आहे.

‘सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट’ (एसपीटीएम) ही संस्था गेली अनेक वर्षांपासून पुण्यातील अपघाती मृत्यूंची वार्षिक आकडेवारी जमा करून त्याचा अभ्यास करीत आहे. एकूण अपघाती मृत्यूंपैकी सुमारे 50-55 टक्के दुचाकीस्वारांचे, तर सुमारे 30-35 टक्के पादचार्‍यांचे असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सिग्नल असलेले चौक हे पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी तुलनेने सुरक्षित असतात. परंतु, तेथेही झेब्रा पट्ट्या आणि पादचारी सिग्नल यांची अवस्था वाईट आहे.

एसपीटीएमने गेली 2 वर्षे केलेल्या पाहणीत सुमारे 30-50% चौकांमधील झेब्रा पट्ट्या ठीकठाक आहेत. पादचार्‍यांच्या सिग्नलची अवस्था अतिशय वाईट आहे. अशा सिग्नलपैकी फक्त 15 टक्के दिवे सुरू आहेत. त्यातही, सगळे पादचारी सिग्नल सुरू असलेले चौक अभावानेच सापडतील, अशी स्थिती आहे.

2021-22 मध्ये मनपाकडे पादचारी सिग्नल दुरुस्त करण्यासाठी रु. 1.5 कोटींची तरतूद होती, जी त्यांनी पूर्णपणे वाया घालवली. सुदैवाने या वर्षीही पादचारी सिग्नलसाठी मनपाने काही आर्थिक तरतूद केली आहे. तिचा वापर करून सगळ्या शहरातील पादचारी सिग्नल या वर्षी तरी दुरुस्त होतील, अशी आशा करू या. वाहतूक पोलिसांनी विविध प्रकारामध्ये अपघातांची वर्गवारी केल्यास त्यावर उपाययोजना करणे सोपे जाईल. ही वर्गवारी करण्यास संस्थेची काही मदत लागल्यास संस्थेकडून तशी मदत करण्यात येईल.
          – हर्षद अभ्यंकर, संचालक, सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट (एसपीटीएम)

सहा महिन्यांत अपघाती मृत्यू
165

एकूण अपघाती मृत्यू
98
दुचाकीस्वार
48
पादचारी
8
चारचाकी वाहनचालक
4
सायकलस्वार
3
तीनचाकी वाहनचालक
1
बसचालक
3

Back to top button