‘आधुनिक शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख’ : महापालिका आयुक्त राजेश पाटील | पुढारी

‘आधुनिक शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख’ : महापालिका आयुक्त राजेश पाटील

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ‘न्यू सिटी’ म्हणून नावारूपाला आलेल्या पिंपरी-चिंचवड या कामगारांच्या शहराने आज एक स्मार्ट सिटी, तसेच एक आधुनिक शहर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शहर स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले. पालिका भवनात आयुक्त पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात पालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दल तसेच, तृतीयपंथी ग्रीन मार्शल, रिव्हर मार्शल व सुरक्षा दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. अग्निशामक दलाने पाण्याच्या तुषारांद्वारे भारतीय तिरंग्याची प्रतिकृती सादर केली. विद्यार्थ्यांनी फेरी काढली. रक्तदान शिबिरात 200 जणांनी रक्तदान केले. आयुक्त पाटील म्हणाले की, शहरात गेल्या काही वर्षांत अनेक विकासकामे झाली आहेत. आतापर्यत 90 टक्क्यांपर्यंत कचरा विलगीकरण होत असून, ऑक्टोबरपर्यंत ते 100 टक्के करण्याचे नियोजन आहे.

आरोग्य सेवेमध्ये 25 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना पालिकेच्या वतीने मोफत सदनिका वाटप करण्यात आले होते. लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. किरण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी आभार मानले.

बिले वसुलीसाठी तृतीयपंथीयांची नियुक्ती
करसंकलन विभागातील करवसुलीचे काम तृतीयपंथीयांच्या शलाका पथकाला देण्यात आले असून, त्याचे नियुक्ती पत्र आयुक्त पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. रिव्हर मार्शल म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

Back to top button