‘युरोपा’ची जमीन बनलेय फ्रॅझल आईस क्रिस्टलने | पुढारी

‘युरोपा’ची जमीन बनलेय फ्रॅझल आईस क्रिस्टलने

वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूचा चंद्र म्हणजे युरोपा. या चंद्रासंबंधी नुकताच नवा शोध लागला आहे. ‘अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी’ नामक पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार युरोपाची बर्फाळ जमीन ‘फ्रॅझल आईस क्रिस्टल’ने तयार झाली आहे. ही एक अशी संरचना आहे की, ती बर्फाच्या चादरीखाली तयार होते. हा बर्फ अत्यंत नरम असतो. मात्र, या बर्फामध्ये मिठाचा बारीक अंशही असतो. अशीच संरचना पृथ्वीच्याही बर्फाखाली बनत असते.

युरोपावरील ‘फ्रॅझल आईस क्रिस्टल’बाबत खगोल शास्त्रज्ञ आता असा अंदाज व्यक्त करू लागले की, युरोपाची बर्फाची चादर आपण जितकी समजत होतो, तितकी खारट नाही. ‘टेक्सास इन्स्टिट्यूट फॉर जियोफिजिक्स’च्या संशोधिका नताली वोल्फेंबर्गर यांनी यासंदर्भात सांगितले की, ज्यावेळी आम्ही युरोपाचा अभ्यास करतो, त्यावेळी आमचे प्राधान्य तेथील समुद्राची लवणता आणि संरचनेवर असते. कारण या दोन मुद्द्यांच्या माध्यमातूनच युरोपावर कोणते जीव विकसित होऊ शकतात, याचा शोध लावला जाऊ शकतो.

खगोलशास्त्रज्ञांसाठी ‘युरोपा’ हा गुरूचा चंद्र संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नासाच्या मते, हा चंद्र सुमारे 60 ते 150 कि.मी. खोल समुद्राने झाकला गेला आहे. याशिवाय त्यावर 15 ते 25 कि.मी. बर्फाची जाड चादर आहे. हा चंद्र आकारात पृथ्वीच्या एक चथुर्तांश इतका आहे. मात्र, तेेथे पृथ्वीवरील महासागरापेक्षा दुप्पट पाणी आहे. युरोपाच्या संशोधनासाठी ‘नासा’ येत्या 2024 मध्ये ऑर्बिटर ‘युरोपा क्लिपर’ पाठवणार आहे.2

Back to top button